हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आजच्या काळात आर्थिक सुरक्षितता ही प्रत्येक गुंतवणूकदाराची प्राथमिक गरज बनली आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार पारंपरिक बँक एफडी (Fixed Deposit) सारख्या सुरक्षित पर्यायांकडे वळतात, परंतु सध्या पोस्ट ऑफिसची (Post Office) टाइम डिपॉझिट योजना (Time Deposit Scheme) अधिक चांगला परतावा देत असल्यामुळे अधिक लोक यामध्ये गुंतवणूक करत आहेत.
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना
भारतीय टपाल विभागाद्वारे (India Post) टाइम डिपॉझिट योजना ही सरकारच्या हमीने चालवली जाणारी सुरक्षित गुंतवणूक योजना आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदार 1, 2, 3 किंवा 5 वर्षांसाठी पैसे ठेवू शकतात आणि ठराविक व्याजदराचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सरकारी पाठिंबा आणि हमखास परतावा, त्यामुळे गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहते.
व्याजदर आणि परतावा
सध्या पोस्ट ऑफिस 5 वर्षांच्या टाइम डिपॉझिटवर 7.5% वार्षिक व्याजदर देत आहे. जो अनेक बँकांच्या एफडी व्याजदरांपेक्षा अधिक आहे. यामुळे दीर्घकालीन बचतीसाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. जर कोणी 5 वर्षांसाठी 5 लाख रुपये गुंतवले, तर 7.5% वार्षिक व्याजदराने गुंतवणुकीची एकूण रक्कम 7,24,974 रुपये होईल. याचा अर्थ, गुंतवणूकदाराला 2,24,974 रुपये केवळ व्याज स्वरूपात मिळतील.
करसवलतीचा लाभही उपलब्ध
या योजनेअंतर्गत गुंतवणूक करणाऱ्यांना आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत करसवलत मिळते. यामुळे केवळ सुरक्षित परतावाच नव्हे, तर कर बचतीचाही लाभ मिळू शकतो, जो अनेकांसाठी महत्त्वाचा असतो.
दरम्यान, जर तुम्हाला जोखीममुक्त, हमखास परतावा आणि कर बचतीचा लाभ हवा असेल, तर पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. सरकारच्या पाठिंब्यामुळे ही गुंतवणूक सुरक्षित आहे आणि एफडीच्या तुलनेत अधिक परतावा देणारी आहे. त्यामुळे भविष्यासाठी आर्थिक स्थिरता निर्माण करण्यासाठी तुम्ही या योजनेचा विचार करू शकता.