हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत गुइलियन बॅरे सिंड्रोम (GBS) च्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आतापर्यंत राज्यात 210 संशयित रुग्ण आढळले असून 182 जणांना GBSची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील चार रुग्ण थेट GBS चे शिकार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता GBS च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकार प्रवासांवर देखील निर्बंध घालण्याचा विचार करत आहे.
महत्वाचे म्हणजे, GBS संसर्गजन्य किंवा गर्दीमुळे पसरत असल्याचे निष्पन्न झाल्यास महाराष्ट्रात प्रवासावर निर्बंध घालण्याचा विचार केला जात आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे. परंतु आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्याचबरोबर , बुलढाणा जिल्ह्यातील मोठ्या पर्यटन सहलींवर देखील बंदी घालण्याचा विचार सुरू आहे. मात्र याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.
दरम्यान, पुढील महिन्यात बुलढाणा जिल्ह्यात सैलानी यात्रा सुरू होणार आहे. मात्र, GBS च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या यात्रेवर निर्बंध लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गर्दीमुळे संसर्ग वाढण्याची भीती असल्याने आरोग्य विभाग मोठ्या यात्रा आणि धार्मिक उत्सवांवर विशेष निर्बंध घालण्याचा विचार करत आहे.
पुण्यातील स्थिती काय?
GBS रुग्णांची संख्या पुण्यातही वाढत आहे. सध्या 42 रुग्ण पुणे महानगरपालिका हद्दीत, 94 नवीन समाविष्ट भागांमध्ये, 32 पिंपरी-चिंचवडमध्ये आणि 32 पुणे ग्रामीण भागात आढळले आहेत. यातील काही गंभीर रुग्णांना ICU आणि व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. पुण्यातील सिंहगड रस्ता, खडकवासला आणि किरकिटवाडी भागात GBS रुग्ण आढळून आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. याच भागातील खासगी RO पाणी शुद्धीकरण प्रकल्पांमधून दूषित पाणीपुरवठा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे पुणे महानगरपालिकेने खासगी RO प्रकल्पांसाठी नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील वाढत्या GBS प्रकरणांमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यामुळे संशयित रुग्णांची तत्काळ तपासणी, दूषित पाणीपुरवठ्यावर नियंत्रण आणि मोठ्या गर्दीच्या ठिकाणी निर्बंध लागू करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. पुढील काही दिवसांत प्रशासन याबाबत महत्वाचे निर्णय घेऊ शकते.