शरद पवारांच्या मागे धनगरांची ताकद उभी राहिली तर भाजपचा गेम होऊ शकतो?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । धनगर समाज (Dhanagar Community) मतं दुसऱ्याला देतो आणि आरक्षणाचा प्रश्न मात्र मी सोडवायचा, हे वागणं बरं नव्हं, शरद पवारांनी २०११९ च्या निवडणुकांच्या तोंडावर केलेलं हे स्टेटमेंट. धनगर समाज शरद पवारांपासून २०१४ पासून दुरावला, आणि पवारांच्या अनेक बालेकिल्ल्यांना धक्के बसले, हा कागदावरचा इतिहास आहे. किमान शरद पवार (Sharad Pawar) ज्या पश्चिम महाराष्ट्रात राजकारण करु पाहतात, त्या पट्ट्यात धनगर समाज निवडणुकीत निर्णायक मतं टाकत असतो. ज्या प्रकारे मराठा, ओबिसी असं राजकारण सुरु असतं, तेव्हा धनगर हा फॅक्टरकडे दुर्लक्ष करुन आपल्याला चालत नाही. त्यात राष्ट्रवादीत दोन गट पडलेले असताना धनगर समाज कुणाच्या पाठिशी उभा राहतो, यावरही अनेकांची राजकीय करिअर अवलंबून असणार आहेत. भाजपने अनेकदा खेळी करुन शरद पवारांच्या पाठिशी असणारी ही धनगर व्होटबँक फोडण्यासाठी प्रयत्न केले. पण पवारांनी अनेक खेळ्या करत धनगरांची शक्ती आपल्या पाठीशी कायम ठेवलीय. लोकसभेच्या रिंगणात शरद पवारांना एकीकडून अजित पवार तर दुसरीकडून भाजपनं जाम केलंय. या सगळ्यात धनगर समाजच आपल्या बालेकिल्ल्यांना संरक्षण देऊ शकतो, हे ओळखून पवारांनीच धनगर कार्ड खेळायला सुरुवात केलीय. धनगर समाज येणाऱ्या निवडणुकीत धनगर समाजाच्या आजूबाजूला राजकारण कसं पेरु पाहतायत? राष्ट्रवादीच्या कोणत्या बालेकिल्ल्यात पवारांना धनगरांशिवाय पर्याय दिसत नाहीये? २०२४ च्या या अटीतटीच्या लढतीत धनगर समाज कुणाला बळ देताना दिसू शकतो? याचंंच केलेलं हे पॉलिटीकल डिकोडींग…

तर घडलंय असं की, अहिल्यादेवी होळकर राजघराण्याचे तेरावे वंशज भूषणसिंह होळकर यांच्या हातात तुतारी देत शरद पवारांनी अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पद मिळणार असून ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लोकसभा निवडणुकीसाठीचे स्टार प्रचारकही असतील. होळकरांना सोबत घेत पवारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. त्यातलं सर्वात महत्वाचं म्हणजे शरद पवार पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या पट्ट्यात राजकारण करतात, तिथं धनगर समाज हा महत्वाचा फॅक्टर असल्याचं अनेक निवडणुकांतून पाहायला मिळालंय. हेच गणित ओळखून पवारांनी अनेक धनगर नेत्यांना, कार्यकर्त्यांना बळ दिलं. बारामतीसारख्या ठिकाणीही धनगरांचं एकगठ्ठा मतदान पाहून पवारांनी तालुक्यातल्या स्थानिक धनगर नेत्यांना बळ दिलं. मात्र ग्राऊंडचं नेटवर्क अनेक वर्षांपासून अजितदादाच सांभाळत असल्यानं राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर या धनगर समाजाच्या नेत्यांची फळी अजितदादांसोबत गेली. अशावेळेस धनगर समाजाला आश्वस्त करेल, असा धनगर समाजातील चेहरा पवारांना काही केल्या मिळत नव्हता.

Sharad Pawar यांच्यामागे धनगरांची ताकद उभी राहिली तर भाजपचा गेम होऊ शकतो?

याचाच एक भाग म्हणून भाजपवर नाराज असलेल्या आणि स्वतंत्र राजकारण करु पाहणाऱ्या जानकरांना माढ्यातून पाठिंबा देण्याची खेळी पवारांनी केली. खरंतर माढा, बारामती, सातारा, अहमदनगर या मतदारसंघात धनगर समाज हा निवडणुकीत गेमचेंजर ठरतो. म्हणूनच पवारांनी जानकरांसोबतची जवळीक वाढवत भाजपचं टेन्शन वाढवलं. जानकर शरद पवारांसोबत येणं म्हणजे धनगर समाजाचं पाठबळ आपल्या पाठिशी आहे, असा मॅसेज पवारांना कन्वे करता आला असता. मात्र भाजपनं संभाव्य धोका ओळखून ज्या जानकरांना साईडसाईन केलं होतं त्यांच्याशीच पुन्हा मिळत जुळत घ्यावं लागून त्यांना एक जागाही सोडावी लागली. शरद पवारांचा हा मोठा डाव फसल्यानंतर आता मात्र त्यांनी घाव हा थेट मुळावर घातलाय. स्वयंघोषीत धनगर नेत्यांची हाजीहाजी करण्यापेक्षा पवारांनी थेट होळकर घराण्यातील तेरावे वंशज भूषणसिंह होळकर यांना सोबत घेत मोठं सोशल इंजिनीयरिंग घडवून आणलंंय. एकतर शरद पवार गटाला गेली काही दिवस ज्या धनगर समाजाच्या एका प्राॅमिनंट फेसची गरज भासत होती ती होळकरांच्या येण्यानं पूर्ण होणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राजघराण्यातीलच व्यक्ती आपल्या सोबत आल्यानं धनगर समाजाची मतांचं गणित जुळवून आणण्यात जे थोडेफार नेते प्रभाव टाकतात त्यांपेक्षा भूषणसिंह होळकर हे राष्ट्रवादीसाठी जास्त फायद्याचं ठरणार आहे.

काकडे, थोरात, तावरे या आपल्या जुन्या प्रतिस्पर्ध्यांच्या दारात जाऊन शरद पवारांनी आपलं वैर संपवू पाहिलं. याला कारण होतं ती बारामतीची निवडणूक. अजितदादांनी स्थानिक कार्यकर्त्यांचं नेटवर्क सक्रीय करुन सुप्रिया सुळेंना कडवं आव्हान उभं केलंय. अशावेळेस राष्ट्रवादीच्या अस्तित्वाचा प्रश्न म्हणून बारामतीचा हा गड काही झालं तरी आपल्या लेकीकडे कायम राहणं गरजेचंय. म्हणूनच होळकरांना सोबत घेत पवार बारामतीत पुन्हा स्ट्राँग झालेत, याला कारण आहे ते म्हणजे बारामती मतदारसंघातील धनगर समाजाचं मतदान. बारामतीत सर्वाधिक मतदान हे धनगर समाजाचं येतं. हा समाज राजकारणात एकच नेता किंवा पक्षाच्या पाठिशी राहतो, हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. हीच मेख ओळखून पवाारांनी होळकरांच्या वंशजांना सोबत घेत काही लाखांत मतदान आपल्या बाजूला वळतं करुन घेतलंय. बारामती सोबतच माढा, सातारा आणि नगरच्या जागेवरही पवारांसाठी हा मोठा एडवांटेज ठरु शकतो. या जागेंच्या लढतीकडे आपण एकवार पाहीलं तर मराठा विरुद्ध मराठा अशा या लढती असणार आहे. त्यातही हे उमेदवार प्रस्थापित मराठ्यांतून येत असल्याने धनगर समाजाला नक्की कुणाला मतदान करायचं हा प्रश्न होता. राजकीयदृष्ट्या संघटितपणे एखाद्या पक्षाच्या मागे उभं राहण्याची या समाजाची परंपरा पाहता या समाजाच्या मतांचं ध्रुविकरण करण्यासाठी जातीय ध्रुविकरण हा एकमेव पर्याय उरतो. म्हणूनच भूषणसिंह होळकर या राजघराण्यातील चेहऱ्याला आपल्यासोबत घेत पवार या ध्रुविकरणात सर्वात फ्रंटला आहेत, हेच यातून दिसतं…

विशेष म्हणजे पवार आणि होळकर यांच्या राजकीय संबंधाना तशी वादाची किनार आहे. साधारणपणे एका वर्षांपूर्वी शरद पवार आणि भूषणसिंह होळकर यांच्यामध्ये कमालीचा वाद पेटला होता. वाफगावचा किल्ला स्वतंत्र करावा यासाठी भूषणसिंह होळकर गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत आहेत. यादरम्यानच वाफगावचा सातबारा हा काय पवारांच्या नावावर आहे का? असा थेट घणाघात भूषणसिंह होळकर यांनी शरद पवारांवर केला होता. मात्र या जुन्या वादावर पडदा टाकत होळकरांची ताकद आपल्या पाठिशी आणण्यात पवारांना यश आलंय.

आता प्रश्न उरतो तो, धनगर समाजातील इतर नेत्यांचा आणि त्यांच्या राजकारणाचा…

माजी मंत्री शिवाजीराव शेडगे यांच्या नेतृत्वाखाली हा समाज काँग्रेससोबत राहत असे. अण्णा डांगे यांच्या नेतृत्वाखाली या समाजाने भाजप-शिवसेनेला १९९५साली साथ दिली होती. त्यानंतर मधल्या काळात हा समाज शरद पवारांच्या सोबतही दिसला. मात्र २०१४ नंतर हा समाज भाजपमागे एकवटला.भाजपने शिंदे, जानकर यांना कॅबिनेट मंत्रीपदं दिली. डॉ. विकास महात्मेंना खासदार केलं. जिल्हा परिषद, पंचायत समितीत या समाजाला तिकिटं दिली. महादेव जानकर, गोपिचंद पडळकर यांच्या राजकारणाला रसद पुरवून भाजपनं धनगर समाजाची मत आपल्याकडे खेचून आणली. २०१९ च्या निवडणुकीत भाजपला याचा मोठा फायदा झाल्याचंही पाहायला मिळालं. पण मराठा आरक्षणाच्या धर्तीवर धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला. धनगर समाजाची सरकारनं फसवणूक केली, असं एक परसेप्शन धनगर समाजात तयार झालंय. समाजाची ही नाराजी अंगलट येऊ शकते हे भाजपला ठाऊक होतं म्हणूनच जानकरांना सोबत घेण्यात त्यांनी जास्त वेळ दवडला नाही. पण पवारांच्या या खेळीने २०१४ पूर्वी पवारांची ढाल बनून असणारा हा समाज पुन्हा एकदा पवारांच्या मदतीला धावून जाऊ शकतो. आधी पवारांच्या विरोधात आग ओकणाऱ्या पडळकरांची अजितदादा महायुतीत आल्यावर बोलती बंद झालीय. तर जानकरांच्या तळ्यात मळ्यातच्या भूमिकेनं या नेत्यांची विश्वासार्हतेवरच समाज प्रश्नचिन्ह उपस्थित करु लागलाय. अशावेळेस यंदाच्या निवडणुकीत समाज कुणाचा शब्द अंतिम मानणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

शरद पवार धनगर समाजाच्या विरोधात असल्याचं परसेप्शन पडळकर, जानकर आणि भाजपातील अनेक नेत्यांनी बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र धनगर समाज आजही पवारांच्या पाठीशी वावरताना दिसतोय. शरद पवारांना वाऱ्याची दिशा कळते, असं म्हणतात. सध्याच्या घडीला एकूणच अनेक गोष्टी विरोधात गेल्यानं धनगर समाज शरद पवारांसाठी तारणहार ठरु शकतो. हा सगळा राजकीय सारीपाट, घडामोडी पाहता धनगरांची एकगठ्ठा ताकद शरद पवारांच्याच पाठिशीच राहिल काय? धनगर समाज यंदा नक्की कुठल्या नेत्याच्या आवाहनाला साद घालतील? यंदाच्याही निवडणुकीत बारामती, माढा, सातारा आणि नगरच्या पट्ट्यात धनगर समाज निर्णायक मतं टाकेल काय? तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं, प्रतिक्रीया आम्हाला कमेंट बाॅक्समध्ये नक्की सांगा.