शिंदेंची शिवसेना वाढली पाहिजे..; प्रकाश आंबेडकरांच्या सूचक वक्तव्याने आघाडीचं टेन्शन वाढलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या मागण्या संबंधित शासकीय राजपत्र देखील निघाले आहे. त्यामुळे मुंबईत होणाऱ्या मनोज जरांगे पाटलांचे ( Manoj Jarange Patil) आंदोलन तूर्तास तरी रद्द झाले आहे. मुख्य म्हणजे, या सर्व पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे. मुख्य म्हणजे, प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत जाणार असतानाच “शिंदेंची शिवसेना वाढली पाहिजे” असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटल्यामुळे आघाडीच्या टेन्शनमध्ये आणखीन वाढ झाली आहे.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

माध्यमाशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “मराठा समाजातील नेते झोपले आहेत. मराठा समाजातील जनतेला मराठा नेत्यांबद्दल चिड तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सहानुभूती दिसते आहे. मराठा समाजाने मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात ज्या मागण्या केल्या त्या मान्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आता स्ट्राँग मराठा लीडर म्हणून पुढे आले आहेत. शिंदेच्या भूमिकेमुळे इतर मराठा नेते हे क्लीन बोल्ड झाले आहेत”

त्याचबरोबर, “मराठा समाजाच्या इतर नेत्यांना बाजूला सारून एकनाथ शिंदे हे सगळ्या मराठा नेत्यांच्या पुढे गेले आहेत. एकनाथ शिंदे हे धाडसी आणि चांगला माणूस आहे, अशी सहानुभूती समाजात निर्माण झाली आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयामुळे भाजपचे मोठे नुकसान होणार आहे. भाजपने शिंदेंना पुढे करून ओबीसी समाजाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यात मराठा समाज आणि ओबीसी समाजाचा फटका भाजपला बसणार आहे.” असा दावा देखील त्यांनी केला आहे.

एकनाथ शिंदेंची शिवसेना वाढली पाहिजे

इतकेच नव्हे तर, “मनोज जरांगे वंचितबाबत सकारात्मक होते. मात्र आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना वाढली पाहिजे. या धाडसी निर्णयाचा शिंदे यांना मोठा फायदा होईल” असे मोठे वक्तव्यं प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच, प्रकाश आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाबाबत सकारात्मक भूमिका दाखवल्यामुळे त्यांच्या मनात नेमके काय चालले आहे, याचा अंदाज बांधला जात आहे.