…. तर मग उद्योजकांनी देश का सोडला? अर्थसंकल्पावरून प्रकाश आंबेडकरांचे मोदी सरकारला 3 तिखट सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम बजेट (Union Budget 2024) संसदेत सादर केलं. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा सरकार कडून घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. सर्वसामान्यांसाठी घरे बांधण्यापासून ते ३०० युनिट पर्यंत मोफत वीज देण्यापर्यंतच्या घोषणा यावेळी करण्यात आल्या. मात्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी या अर्थसंकल्पावरून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत ट्विट करत सरकारला ३ प्रश्न केले आहे. जर अर्थव्यवस्था चांगली असेल, तर मागच्या 9 वर्षांत 12,88,293 अती श्रीमंत व्यक्ती आणि उद्योजकांनी देश का सोडला? ”वायब्रंट गुजरात” मधील 7,25,000 लोकांनी बेकायदेशीर रित्या अमेरिकेत घुसण्याचा प्रयत्न का केला? वास्तविक सरासरी उत्पन्नात 50% वाढ झाली या माहितीचा स्त्रोत काय? असे एकामागून एक तिखट सवाल करत प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या आणि दिलेली माहिती शंकास्पद आहे असेही त्यांनी म्हंटल.

अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार- उद्धव ठाकरे

दरम्यान, हा अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार आहे असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. लहानपणी एक जादूगार यायचा रिकामी टोपी दाखवायचा. मंत्र म्हणायचा. झोळीत हात घालायचा आणि कबुतर काढायचा. तेव्हा आश्चर्य वाटायचं, त्यावेळी आपण यालाच मत देणार असे ठरवायचो. पण आपल्या लक्षात हे आलं नाही की कबुतर उडून गेलं, टोपी आपल्याला घातली, हा अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार आहे असं ठाकरेनी म्हंटल. तसेच आता महिलांना फुकट सिलेंडर देतील. तरुणांना नोकऱ्या देणार असे म्हटले मग 10 वर्ष काय केले?, असा सवाल सुद्धा त्यांनी केला आहे.