ऊसतोड्याचं पोर प्रणिती शिंदेंना खासदारकीला जड जाणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा असून इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते. मग तो इथला असो किंवा बाहेरचा, सोलापूरची लेक म्हणून मी तुमचं सोलापुरात स्वागत करते, भाजपनं आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहिर करताच काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी सातपुते सोलापुरात उपरे, बाहेरचे असल्यााचं अंडरलाईन करत पत्र लिहीलं. बीडचं पार्सल बीडला पाठवा.. असेे पोस्टर्सही काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदारसंघात व्हायरल केले. ही लाईन पुढे जात सातपुतेंनी शिंदेंच्या या उपऱ्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. माझ्या आईवडिलांनी या सोलापुरात सालगडी म्हणून काम केलं. मीही जनतेचा सालगडी म्हणून काम करेन. खासदारकीला सुशिलकुमार शिंदेंचा दोनदा आणि पत्नीचा एकदा पराभव झालाय. आता शिंदे परिवाराला चौथ्यांदा धुळ चारु, अशा कडवट शब्दात सातपुतेंनीही मैदान तापवलं. एकूणच काय तर सोलापुरचं राजकारण निवडणूक होईपर्यंत असंच धगधगत राहणार आहे एवढं नक्की…

काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या सोलापुरात (Lok Sabha Election 2024) भाजपनंं लिंगायत फॅक्टर पुढे करत सलग दोनदा विजय मिळवला. सुशिलकुमार शिंदेंसारख्या काँग्रेसमधील बड्या नेत्याला इथं पराभव स्विकारावा लागला. २०१९ मध्ये वंचितनंं केलेलंं मतविभाजनही त्याला कारणिभूत ठरलं. त्यामुळे राजकीय पटलावर अनेक उलथापालथी झाल्यावर वंचितच्या एण्ट्रीने सोलापुरातही यंदा तिरंगी लढत आहे. वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मैदानात उतरलेल्या प्रणिती शिंदे यांना सातपुते जड जाणार का? गेल्यावेळेस काँग्रेसवर उलटलेली वंचितची उमेदवारी यंदा कुणाला लॉसमध्ये घेऊन जाणार? पश्चिम महाराष्ट्राच्या टोकावर असणाऱ्या सोलापुरच्या खासदारकीला कुणाची ताकद किती आहे? तेच आज आपण जाणून घेऊयात ..

गेल्या दोन लोकसभा निवडणुका पाहता सोलापूर लोकसभेचा पेपर भाजपसाठी सोपा गेला आहे. दोन्ही वेळा भाजपने नवीन उमेदवार देऊनही त्यांना घवघवीत यश मिळालं. यंदाही भाजपने नवीन उमेदवार जाहीर केला आहे. सोलापुर मतदारसंघाच्या राजकारणावर एकवार नजर टाकली तर आपल्याला अनेक आश्चर्यकारक गोष्टी बघायला मिळतील. 1952 साली सोलापूर लोकसभा मतदार संघाची स्थापना झाली. सुरुवातीचे पाच वर्ष शेतकरी कामगार पक्षाचे शंकर मोरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या शेड्युल कास्ट फेडरेशनचे पी. एन. राजभोग यांनी सोलापूरचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलं. 1957 साली सोलापुरात संयुक्त महाराष्ट्र समितीचे जयवंत मोरे हे सोलापूरचे खासदार झाले.

Devendra Fadanvis यांच्या गोटातील आक्रमक Ram Satpute खासदार होतील का?

मतदारसंघ स्थापनेच्या 10 वर्षानी सोलापुरात 1962 साली काँग्रेसचा उदय झाला. 1996 आणि 2003 या दोन निवडणुकांचा अपवाद वगळला तर 2014 पर्यंत काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व सोलापूर लोकसभा मतदार संघात गाजवलं. मात्र 2014 च्या मोदी लाटेत काँग्रेसचा बुरुज ढासळला आणि हा मतदारसंघ भाजपकडे आला. नवखे असलेल्या शरद बनसोडे यांचा तब्बल दीड लाख मतांनी विजय झाला. त्यानंतर 2019 साली झालेल्या सलग दुसऱ्या निवडणुकीत देखील सुशीलकुमार शिंदेना परभवाचा सामना करावा लागला. भाजपच्या डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामिंनी शिंदे सारख्या दिग्गज नेत्याला धूळ चारली.

सलग दोन वेळा उमेदवार बदलीचा भाजपचा पॅटर्न राहिल्याने यंदाही तोच फॉर्मुल्या भाजप राबवणार असंं वाटत असताना झालंही तसंच…भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माळशिरसचे विद्यमान आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांच्यावर भाजपने सोलापुरसाठी विश्वास टाकला. तर काँग्रेसने सोलापुर मध्यच्या सलग तीन टर्मच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना मैदानात उतरवलं. त्यामुळे दोन्ही बाजूने लोकसभेेसाठी नवखे मात्र निवडणुकीसाठीचे छक्केपंजे माहीत असलेले उमेदवार रिंगणात असल्याने सोलापुरच्या लढतीला रंगत असणार आहे.

मतदारसंघाच्या डेमोग्रोफीचा विचार केला तर सोलापुरात लिंगायत बहुल मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर पद्मशाली समाज, मुस्लीम अनुसूचित जाती, धनगर समाज यांचा क्रमांक येतो. इथला लिंगायत समाज परंपरेप्रमाणे भाजपला मतदान करत आला आहे. 2014 साली शरद बनसोडे आणि 2019 मध्ये जयसिद्धेश्वर स्वामींनी सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता. त्यावेळी लिंगायत समाजाचं एकहाती मतदान हे भाजपला पडलं होतं. पण वंचित बहुजन आघाडीसुद्धा अनेक वर्षांपासून या मतदारसंघावर आपला दावा करत आहे. सोलापूर मतदारसंघात 2014च्या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाचा उमेदवार आणि 2019ला वंचितचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता. त्याचा फटका सुशीलकुमार शिंदे यांना बसला होता. त्यावेळी दलित आणि मुस्लिम मतांचं विभाजन झाल्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता. यंदाही वंचितनं सोलापुरातून राहुल गायकवाड यांना मैदानात उतरवल्यानं याचा फटका नेमका सातपुतेंना बसतोय की शिंदेंना? हेे पाहावं लागेल…