प्रतापगड पर्यटकांसाठी आजपासून सुरू : अफझलखान कबर परिसरातील अतिक्रमण मोहिम पूर्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
प्रतापगड येथील अफजल खान कबरीवरील अतिक्रमण हटवण्याची मोहिम गेल्या आठवड्यात सुरू होती. यासाठी किल्ले प्रतापगड पुर्णपणे पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. परंतु आता आज गुरूवारी (दि. 17) प्रतापगड पर्यटकांसाठी सुरू करण्यात आला आहे. यामुळे अतिक्रमण हटविल्यानंतर प्रतापगड पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करण्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तवली जात आहे.

गेल्या आठवड्यात गुरूवारी (दि.10) रोजी पहाटे प्रशासनाने सर्जिकल स्ट्राईक करत अफझलनखान यांच्या कबर परिसरातील अतिक्रमण हटविले. यासाठी जवळपास 5 दिवस मोहिम सुरू होती. प्रशासनाने प्रतापगड परिसरात 144 कलम लावण्यात आले होते. या परिसरात पर्यटकांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. कबर परिसरातील अतिक्रमण हटविल्यानंतर प्रतापगड परिसर कसा दिसणार, हे पाहण्यासाठी पर्यटकांच्यात उत्सुकता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पर्यटकांची प्रतापगडावर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. सध्या या परिसरात पोलिसांचा बंदोबस्तही आहे.

या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे अचानक सर्व काही बंद झाल्याने स्थानिकांनचे प्रचंड हाल झाले. गडावरील सर्व उदरनिर्वाह पर्यटनावरतीच अवलंबून आहे. यामुळे दररोज कमवणे व घर चालवणे हेच दिनक्रम आहे. गडाच्या पायथ्याशी असलेली 8 ते 10 गावांचा देखील रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. आता प्रतापगडला जाण्यासाठी सुरू झाल्याने हा प्रश्न सुटणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्याच्या निर्णयाचे स्थानिकांना मध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापुढे किल्ले प्रतापगडला लाखो पर्यटक व शिवभक्त भेट देतील अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली.