Sunday, May 28, 2023

शाश्वत विकास ध्येयआधारित ग्रामपंचायत विकास आराखडे तयार करा : अर्चना वाघमळे

सातारा : ग्रामपंचायतीकडे 15 वा वित्त आयोग, स्व निधी, मनरेगा, स्वच्छ भारत मिशन, जल जीवन मिशन, सीएसआर, जिल्हा वार्षिक योजना अशा विविध योजनेंतर्गत निधी उपलब्ध असतो. या सर्व निधींचा एकत्रित विचार करुन शाश्वत विकास ध्येयआधारित ग्रामपंचायत विकास आराखडे तयार करा, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अर्चना वाघमळे यांनी केले.
पाचवड व वेळे (ता. वाई) येथे सुरु असलेल्या प्रशिक्षण वर्गात श्रीमती वाघमळे बोलत होत्या. या प्रसंगी ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था कोल्हापूरचे अलमास सय्यद, वाईचे गटविकास अधिकारी नारायण घोलप यांच्यासह ग्रामसेवक उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचा सन 2023-24 चा ग्रामपंचायत विकास आराखडा शाश्वत ध्येय 9 संकल्पनांवर आधारित तयार करण्यात येणार आहे. यामध्ये जलसमृद्ध गाव, स्वच्छ व हरित गाव, स्वंयपूर्ण पायाभूत सुविधायुक्त गाव या संकल्पनांची निवड करण्यात आलेली आहे, असेही श्रीमती वाघमळे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमात सांगितले.