पंतप्रधान मोदी पनौती आहे, त्यांच्यामुळे भारत मॅच हरला; राहुल गांधींची जोरदार टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या वर्ल्ड कप मॅचमध्ये भारताला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. तेव्हापासून सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पनौती नावाने डिवचण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर, सोशल मीडियावर नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पनौती असा ट्रेंड देखील सुरू आहे. त्यामुळे एकंदरीत भारताच्या पराभवाला नेटकऱ्यांनी नरेंद्र मोदींना जबाबदार झाल्याचे दिसत आहे. मुख्य म्हणजे, आता नेटकऱ्यांबरोबर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील मोदींनी पनौती म्हणून संबोधले आहे.

मंगळवारी आगामी निवडणुकांच्या प्रचारासाठी राजस्थानमध्ये आलेल्या राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. तसेच यावेळी त्यांनी, वर्ल्ड कपमधील टीम इंडियाच्या पराभवाचा उल्लेख करत यासाठी नरेंद्र मोदींना जबाबदार धरले. प्रचार सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “पीएम मोदी म्हणजे पनौती मोदी आहेत, भारतीय टीम खेळत होती, पण हे पनौती तिकडे गेले आणि आपल्या टीमला हरवलं. टीव्हीवाले हे सांगणार नाही परंतु जनतेला माहित आहे”

त्याचबरोबर, “ते नुसते लोकांना भुलवतात. कधी इकडे नेतात तर कधी तिकडे नेतात. त्यांच्या धोरणाचा फायदा देशातल्या काही उद्योगपतींनाच झाला आहे. गेल्या नऊ वर्षाच्या कालावधीत मोदींनी देशातल्या दहा ते पंधरा उद्योगपतींचे 14 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केलं. आता त्या उद्योगपतींमध्ये कोण गरीब होतं? कोण मागासलेलं होतं?” अशी टीका देखील राहुल गांधींनी मोदींवर केली.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला हार पत्करावी लागली. संपूर्ण सामना चांगला खेळला तरी अखेरच्या क्षणाला ऑस्ट्रेलियाने भारताला सहा विकेटवर हरवलं. मुख्य म्हणजे, वर्ल्ड कप सामना पाहण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी यांना पनौती म्हणून संबोधले जात आहे. तसेच, “पंतप्रधान मोदी मॅच पाहिला गेले नसते तर बरं झालं असतं, ते देशालाच लागलेली एक पनौती आहे” अशी टीका मोदींसंदर्भात करण्यात येत आहे. त्यानंतर आज राहुल गांधी यांनी देखील मोदींनी पनौती म्हणल्यामुळे चर्चांना आणखीन जोर आला आहे.