मराठा आंदोलकांवरच्या हल्ल्याच्या घटनेवरून पृथ्वीराज चव्हाण आक्रमक; थेट केली ‘ही’ मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्याची घटना घडली. या घटनेमध्ये महिलांसह अनेक उपोषणकर्ते गंभीरपणे जखमी झाले आहेत. या घटनेनंतर माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण आक्रमक झाले आहेत. त्यांनी घटनेचा निषेध व्यक्त केला असून गृहमंत्र्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी थेट मागणी केली आहे.

माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मराठा आरक्षणबाबत सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. पण आता तर हे शांततापूर्ण आंदोलन दडपण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. आंदोलन दडपण्याचे आदेश मुंबईतून दिले असल्याचे कळते. या निंदनीय घटनेची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे.

मराठा आरक्षण देण्याबाबत भाजप ने कायमच पोकळ घोषणा आतापर्यंत केल्या आहेत. केंद्रात व राज्यात भाजपचेच सरकार असताना मराठा समाजाला भाजपा सरकार आरक्षण का देऊ शकत नाही? हे सरकारने स्पष्ट करावे.

इतकी वर्षे प्रलंबित असणारा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा बांधवांच्याकडून आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरु असताना अशावेळी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांचे आंदोलनच दडपण्याचा क्रूर प्रकार सरकारकडून केला जात आहे.म राठा बांधवांच्यावर आज झालेला लाठीचार्जची घटना निंदनीय असून या घटनेची गृहमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी आम्ही करत असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.