हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचे छापे पडल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. फडणवीसांनी सत्तेचा गैरवापर केला असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मला काही दिवसांपूर्वी प्राप्तिकर विभागाची नोटीस आली होती. त्यापूर्वी शरद पवार, सुप्रिया सुळे यांनादेखील नोटीस आली होती. हा सर्व प्रकार निषेधार्ह आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.
विरोधी पक्षांच्या प्रमुख माणसांना टार्गेट केले जातेय. सत्ताधारी पक्षाने गेल्या पाच वर्षात केलेले आर्थिक भ्रष्टाचार दिसत नाहीत, असा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केला. देवेंद्र फडणवीसांनी सत्तेचा गैरवापर केला. आमच्याकडेही सत्ता होती पण आम्ही साम, दाम, दंड आणि संस्थांचा वापर केला नव्हता, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.आम्ही महाविकास आघाडी सरकार स्थापन केले नसते तर आमचे राहिलेले नेतेही त्यांनी त्यांच्या पक्षात घेतले असते. असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
शरद पवार, अजित पवार यांना ईडीची नोटीस दिली होती. ज्यांनी दिली त्यांनीच ती माघारी घेतली. राजकीय कारणाकरता हे सर्व चालले आहे, हे निषेधार्ह आहे. पनामा पेपर्स, पॅराडाईज पेपर्स अशा प्रकरणातील परदेशी कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणूक केलेली कागदपत्रे तुमच्याकडे पडलेली आहेत. त्यापैकी किती जणांवर कारवाई झाली, पोकळ घोषणाबाजी बास झाली, असा इशारा चव्हाण यांनी दिला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’