कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
मी सहकारातील निवडणुकीत सहसा सहभाग घेत नाही. परंतु राज्यात अनपेक्षित सत्तांतर झाले. यामुळे सहकारी क्षेत्रात अपप्रवृत्ती डोकावू पाहत आहेत. केंद्र व राज्याची चौकशी यंत्रणा राजकीय नेत्यांना त्रास देत आहेत. यातून सहकारी क्षेत्रात त्यांना सत्ता घ्यायची आहे. हा केंद्र व राज्यातील पॅटर्न बघून मी कराड शेती उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितासाठी राहिली पाहिजे. तिचे राजकीय भक्षण करू नये, यासाठी थेट निवडणुकीत उतरलो आहे. या निवडणुकीतील विजय विलास काकांना श्रद्धांजली ठरेल. असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार प्रारंभ व आ. पृथ्वीराज चव्हाण व उदयसिंह पाटील – उंडाळकर यांच्या नेतृत्वाखालील (स्व.) लोकनेते विलासराव पाटील (काका) रयत पॅनेलच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
उदयसिंह पाटील – उंडाळकर, काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, प्रदेश काँग्रेसचे सदस्य अजितराव पाटील – चिखलीकर, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, उत्तरचे अध्यक्ष निवासराव थोरात, कोयना दूध संघाचे चेअरमन वसंतराव जगदाळे, माजी चेअरमन संपतराव इंगवले, प्रा. धनाजी काटकर, कराड पंचायत समितीचे माजी सभापती एम. जी. थोरात, किसनराव जाधव, कोयना सहकारी बँकेचे चेअरमन रोहित पाटील, कराड तालुका खरेदी- विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, बाबुराव धोकटे, युवा नेते इंद्रजित चव्हाण, शंकरराव खबाले, मंगल गलांडे, नामदेव पाटील, पैलवान नानासाहेब पाटील, जयवंतराव जगताप, नरेंद्र नांगरे – पाटील, शिवाजीराव मोहिते, नितीन थोरात, कराडचे माजी नगराध्यक्ष अशोकराव पाटील, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, विद्याताई थोरवडे, गीतांजली थोरात, तसेच लोकनेते विलासराव पाटील (काका) रयत पॅनेलचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, बाजार समिती स्वातंत्र्यपूर्व काळात निर्माण झाली. राज्यात सक्षम असणारी ही संस्था आहे. विलास काकांनी ही संस्था जोपासली आणि वाढवली. खरं तर कराड बाजार समिती बिनविरोध व्हायला हवी होती. ही संस्था वाचवली पाहिजे. या भावनेतून आम्ही एकत्र आलो आहोत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेवून ही निवडणूक विलास काकांना श्रद्धांजली ठरणार आहे. सार्वजनिक निवडणुकीत यश मिळत नसल्याने प्रतिगामी विचार सहकारात येवू पाहत आहे. देशात जे काही चालले आहे. त्याची अप्रत्यक्ष उजळणी होणार आहे. सर्वसामान्यांचे हकक, अधिकार धोक्यात आले आहेत. याचा विचार या निवडणुकीत केला पाहिजे. बाजार समितीची निवडणूक गांभीर्याने घेवून आपण विजयी होवू.
उदयसिंह पाटील म्हणाले, विलासकाकांच्या पश्चात ही निवडणूक होत असून, संघटनेच्या माध्यमातून आपण सभासदांसमोर जाणार आहोत. समविचारी लोकांची मोट बांधून ही निवडणूक लढवली जाईल. व्यक्तिगत स्वार्थासाठी प्रस्थापित लोकं सर्वसामान्यांच्या हक्कावर टाच आणत आहेत. समाजावरील अतिक्रमण थोपवणे गरजेचे आहे. तसेच पुरोगामी विचारांची पाठराखण व्हावी, या हेतूने मी आणि पृथ्वीराजबाबा विशेष भूमिका घेवून एकत्र आलो आहोत.
ते म्हणाले, विलासकाकांनी सर्वसामान्यांना ताकद देण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. मध्यंतरी सत्तेत आलेल्या मंडळींनी बाजार समितीवर सुमारे पन्नास कोटी रुपये कर्ज केले. पण काकांनी पुन्हा बाजार समितीची सत्ता घेतली. आणि आज हीच बाजार समिती आता तीन कोटी रुपयांची ठेव बाळगून आहे. आता त्याच मंडळींना सत्ता हवी आहे. विरोधी एकत्र आलेल्या मंडळींनी त्यांचा मूळ विचार बाजूला ठेवला आहे. विरोधकांना लोकांना गुलाम करून स्वतःची सत्ता राखण्यासाठी बाजार समितीची सत्ता हवी आहे.
रयत सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त झाला आहे. हे विलासकाकांच्या मार्गदर्शनाखाली घडले. याच कारखान्याच्या विस्तारवाढीला विरोधकांनी अडथळा आणला आहे. काकांनी सर्वसामान्यांना सत्ता दिली. हेच सूत्र घेवून बाजार समितीच्या निवडणुकीत आम्ही उमेदवार उभे केले आहेत. वैचारिक परिवर्तन घडवण्याची गरज ओळखून सर्वजण एकत्र काम करणे गरजेचे आहे.
यावेळी अजितराव पाटील – चिखलीकर म्हणाले, लोकनेते विलासराव पाटील – उंडाळकर यांनी कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या बैल बाजारासाठी पन्नास एकर जमीन आरक्षित केली. विलासकाकांचे बाजार समितीमधील योगदान महत्त्वाचे आहे. मग या निवडणुकीत गाय रुतली आणि वासरू पुढे निघून गेले, ही अवस्था विरोधकांमध्ये आहे.
यावेळी बाजार समितीवर बिनविरोध निवडून आलेल्या गणपत पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मनोहर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. अशोकराव पाटील, जयवंतराव जगताप, प्रा. धनाजी काटकर, अजितराव पाटील – चिखलीकर, भानुदास माळी यांचे भाषणे झाली. अशोकराव पाटील – पोतलेकर यांनी आभार मानले.