राज्यातील 385 नगरपालिका-नगरपरिषदांना महिन्यात मिळणार थकीत मुद्रांक शुल्क अनुदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील 385 नगरपालिका व नगरपरिषद यांचे थकीत मुद्रांक शुल्क अनुदान त्वरित देण्यात यावे अशी लक्षवेधीद्वारे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधानसभेत मागणी केली. या मागणीमुळे राज्यातील 385 नगरपालिका व नगरपरिषद यांना महिन्यातच थकीत अनुदान दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु असून आज पार पडलेल्या अधिवेशनाच्या कामकाजावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्वाची लक्षवेधी सूचना मंडळी. यावेळी ते म्हणाले की, राज्यातील सर्व महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रांमध्ये जे काही स्थावर मालमत्तांचे हस्तांतरण होते, खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात त्यावर मुद्रांक शुल्क आकारले जाते. शासनाकडून एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभार लावला जातो. हा अधिभार ज्या परिसरातील मिळकतींचे हस्तांतरण झाले असेल त्या महानगरपालिका किंवा नगरपालिकांना मुद्रांक शुल्क अधिभार दिला जातो.

२०१४-१५ ते २०२२-२३ पर्यंत हा मुद्रांक शुल्क अधिभार नगरपालिकांना दिला गेलेला नाही. मात्र मार्च २०२३ साली रु. ७११ कोटी राज्यातील २४ महानगरपालिकांना शासनाने वितरित केलेले आहे. परंतु राज्यातल्या ३८५ नगरपालिका व नगरपंचायती यांना मुद्रांक शुल्कचे अनुदान रु. ५७७ कोटीं २०१४-१५ पासून थकीत आहे. त्यामध्ये जवळपास ७० कोटींचे अनुदान यावर्षी देण्यात आलेले आहे अशी माहिती मिळते. त्यामुळे शासनाने महानगरपालिका व नगरपालिका असा भेदभाव न करता, महानगरपालिकाना जसे थकीत अनुदान दिले तसेच थकित अनुदान नगरपालिका नगरपंचायती यांना सुद्धा त्वरित देण्यात यावे अशी आग्रही मागणी आ. चव्हाण यांनी विधानसभेत केली.

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री उदय सामंत म्हणाले कि, महानगरपालिकांना ज्याप्रमाणे थकीत मुद्रांक शुल्क अनुदान दिले गेले त्याचप्रमाणे ३८५ नगरपालिका व नगरपंचायतीना सुद्धा थकीत मुद्रांक शुल्क अनुदान लवकरात लवकर दिले जाईल. तसेच एक टक्का मुद्रांक शुल्क जे राज्य शासनाला दिले जाते ते इकडे न देता थेट नगरपालिका नगरपरिषदांनाच दिले गेले तर हा थकीतचा प्रश्न राहणार नाही याबाबत महसूल मंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

परंतु आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आग्रही मागणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ३८५ नगरपालिका व नगरपंचायती यांचे थकीत मुद्रांक शुल्क अनुदान येत्या महिनाभरात दिले जाईल, अशी ग्वाही दिली. दरम्यान आता माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या आग्रही मागणीमुळे राज्यातील ३८५ नगरपालिका व नगरपंचायती यांना येत्या महिन्याभरात थकीत अनुदान दिले जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिवेशनात सांगितले.