Prithviraj Chavan On Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरवेळी पहिल्याच दिवशी आपण हरलो होतो; पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याने खळबळ

_Prithviraj Chavan On Operation Sindoor
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Prithviraj Chavan On Operation Sindoor । ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) पहिल्या दिवशी म्हणजे 7 मे 2025 रोजी भारतीय वायूदलाचा पूर्णपणे पराभव झाला होता, असा खळबळजनक दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पाकिस्तानने पहिल्या दिवशी भारताची विमानं पाडली असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटल आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दाव्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी मात्र पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे.

भारताचे दिवसभरात एकही विमान उडाले नाही- Prithviraj Chavan On Operation Sindoor

प्रसारमाध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कोणी मान्य करो अथवा न करो पण ऑपरेशन सिंदूरवेळी पहिल्याच दिवशी आपण हरलो होतो. ७ मे रोजी पहिल्या दिवशी पाकिस्तानने भारताची विमानं पाडली. त्यानंतर भारताचा संपूर्ण एअरफोर्स ग्राऊंड झाला. त्यानंतर भारताचे दिवसभरात एकही विमान उडाले नाही. भारतीय वायूदलाचे विमान कुठेही उडाले तर… ग्वाल्हेर, भटिंडा, सिरसा अशा सर्व हवाई तळांवरुन एकही विमान उडाले नाही. कारण त्याठिकाणी पाकिस्तानकडून विमान पाडले जाण्याची शक्यता होती, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले, आपल्याकडे १२ लाख सैन्य आहे, २५ लाख सैन्य आहे की १ कोटी सैन्य आहे याला काही अर्थ नाही. कारण युद्धच होणार नाही तुम्हाला कुणी युद्ध करुच देणार नाही. ऑपरेशन सिंदूरवेळी सुद्धा आपण हेच पाहिलं.ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कराची एक किलोमीटरही हालचाल झाली नाही. हवाई युद्धं झाली, पुढची युद्धंही तशीच होणार आहेत. मग आपल्याला १२ लाख लष्कर ठेवण्याची काही गरज आहे का? असा सवाल करत त्याऐवजी त्यांच्याकडून दुसरं काहीतरी काम करुन घेऊ असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.

शिंदेंची टीका-

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे, भारताचा युद्धात पराभव झाला, असं बोलणाऱ्यांना पाकिस्तानचा विजय हवा आहे का? हे पाकिस्तानच्या बाजूने बोलतात, हे कसले भारतीय? ही कसली राष्ट्रभक्ती, हा तर देशद्रोह आहे, अशाप्रकारची वक्तव्यं करणाऱ्यांचा मी निषेध करतो अशा शब्दांत शिंदेनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पलटवार केला.