विरोधकांची युती अभद्र, वैयक्तिक स्वार्थासाठीच ते एकवटलेत; पृथ्वीराजबाबांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
बाजार समिती हि सर्वसामान्य शेतकऱ्यांची संस्था आहे व ही शेतकऱ्यांची संस्था शेतकऱ्यांच्याच हातात राहावी यासाठी शेतकऱ्यांनाच प्रतिनिधी म्हणून निवडून दिले पाहिजे असे आवाहन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. कराड तालुक्याच्या राजकीय व सामाजिक जीवनामध्ये एक मैलाचा दगड ठरेल अशी हि निवडणूक होत आहे असेही त्यांनी म्हंटल. मसूर येथे आयोजित स्व. विलासराव पाटील (काका) रयत पॅनल च्या मेळाव्यात पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कराड उत्तर मधील एका सहकारी संस्थेच्या निवडणुकीत १९९७ साली मी सहभाग घेतला होता. कारण त्यावेळी सुद्धा आजच्या सारखी परिस्थिती त्या संस्थेची झाली होती. म्हणून शेतकऱ्यांच्या हक्काची संस्था शेतकऱ्यांच्या हातात राहिली पाहिजे या उद्देशाने त्या निवडणुकीत सहभाग घेतला होता. त्यावेळी स्वतः शरद पवारांनी मला विचारले होते कि, सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कसा काय सहभाग घेतला ? त्यावेळी त्यांना मी सांगितले होते या भागातील शेतकरी माझे मतदार आहेत आणि त्यांचा ऊस कारखान्याला जातो कि नाही, त्यांच्या अडचणी या माझ्या अडचणी आहेत यासाठी मी निवडणुकीत भाग घेतला, अत्यंत अटीतटीची ती निवडणूक झाली होती. त्यानंतर कोणत्याही सहकारी संस्थांच्या निवडणुकीत मी प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही.

आज या निवडणुकीत मी का सहभाग घेतला ? कारण या निवडणुकीत अभद्र युती विरोधकांनी केली आहे, ज्यांच्या घरातच प्रत्येक संस्था आहे, प्रत्येक संस्थेत त्यांच्याच घरातील लोक पदावर आहेत आणि आता पुन्हा या संस्थेत सुद्धा त्यांचा तोच प्रयत्न होत आहे हे बघूनच या निवडणुकीत मी सहभाग घेतला आहे. सभासदांचे-शेतकऱ्यांचे हित न बघता फक्त वैयक्तिक स्वार्थासाठीच विरोधक एकवटले आहेत असा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

यावेळी उदयसिंह पाटील म्हणाले, स्व. काकांनी कराड तालुक्यात काम करीत असताना कधीही उत्तर दक्षिण असा भेदभाव केला नव्हता. कराड तालुका कायम त्यांनी एकसंघ बघितला. तालुक्यातील शिखर संस्थांच्या निवडणुकीत सर्वसामान्य शेतकरी ज्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही अशा व्यक्तींना काकांनी या शिखर संस्थेत नेतृत्व करण्याची संधी दिली.