Property Knowledge| भविष्याच्या सुरक्षेतेसाठी एखादी प्रॉपर्टी खरेदी करणे सर्वात फायदेशीर ठरते. लक्षात घ्या की, सध्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये 2 प्रकारच्या प्रॉपर्टी उपलब्ध आहेत. यात बांधकाम सुरू असताना विकत घेतलेल्या प्रॉपर्टीचा आणि दुसरा खरेदी करताच वापरण्यात येणाऱ्या प्रॉपर्टीचा समावेश आहे. यातील सर्वात फायद्याची ठरते ती रेडी-टू-मूव्ह प्रॉपर्टी. म्हणजेच जी प्रॉपर्टी खरेदीदार लगेच वापरू शकतो. परंतु अशा प्रॉपर्टी (Property Knowledge) खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवण्याची आवश्यकता असते. अन्यथा खरेदीदाराला आर्थिक फटका बसू शकतो.
प्रॉपर्टीची कागदपत्रे तपासा – एखादी प्रॉपर्टी खरेदी करत असताना सर्वात आवश्यक असते ते म्हणजे प्रॉपर्टीच्या खऱ्या मालकाशीच व्यवहार करणे. अनेकवेळा काही डीलर्स फसवणुकीच्या दृष्टीने दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असलेली प्रॉपर्टी एका तिसऱ्याच व्यक्तीचे नाव सांगून विकत असतात. अशावेळी तुम्हाला त्या प्रॉपर्टीचा खरा मालक कोण आहे म्हणजे प्रॉपर्टीच्या कागदपत्रांवर मालक म्हणून नेमके कोणाचे नाव आहे हे जाणून घेण्याची आवश्यकता असते. अशावेळी तुम्ही सर्वात प्रथम महसूल कार्यालयात जाऊन प्रॉपर्टीचा मालक शोधा. तसेच, संबंधित कागदपत्रांसह मालकी हक्काची ओळख पटवावी. यामुळे प्रॉपर्टी व्यवहारात तुमची कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही.
कंस्ट्रक्शनची वेळ तपासून घ्या – एखादी प्रॉपर्टी खरेदी करताना ही प्रॉपर्टी नेमकी कधी बांधली गेली आहे याची नीट तपासणी करावी साधारणपणे कोणत्याही बांधकामाचे वय 70 ते 80 मानले जाते. त्यामुळे लक्षात घ्या की, मालमत्ता जितकी जुनी असेल तितकीच तिची किंमत नव्याने बांधलेल्या मालमत्तेपेक्षा कमी असेल. त्यामुळे प्रॉपर्टी खरेदी करताना या सर्व बाबींचा विचार करावा. तसेच, सर्वात प्रथम खरेदी करत असलेल्या घर किंवा फ्लॅटच्या बांधकामाचा दर्जा तपासावा. अन्यथा पुढे जाऊन बांधकामात दुरुस्ती करण्यासाठी तुम्हालाच अधिक पैसे भरावे लागतील.
प्रॉपर्टी परिसरातील सुविधा पहा – तुम्ही ज्या ठिकाणी प्रॉपर्टी खरेदी करत आहात, तेथे आजूबाजूचा परिसर कसा आहे? त्या परिसरात तुम्हाला आवश्यक असलेल्या सुविधा आहेत की नाहीत? याची खात्री करून घ्या. तसेच मुलांसाठी शाळा, कॉलेज, बस स्टँड , जिम, मॉल, हॉस्पिटल अशा गरजेच्या गोष्टी देखील परिसराच्या अवतीभवती आहेत की नाही हे पहा. या सर्व गोष्टींची तपासणी केल्यानंतर तुम्हाला पुढे जाऊन कोणत्याही प्रकारची अडचण जाणवणार नाही.
वेल्फेअर असोसिएशनची आहे की नाही – ज्या ठिकाणी तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करत आहात तिथे रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन कार्यरत आहेत की नाहीत हे सर्वात प्रथम पहा. ते उपलब्ध नसल्यास तुम्हाला छोट्या-छोट्या कामांसाठी दुसऱ्या व्यक्तींवर अवलंबून राहावे लागेल. या कारणामुळेच प्रॉपर्टी खरेदी करताना आजूबाजूची वस्तुस्थिती समजून घ्या. यानंतरच प्रॉपर्टी (Property Knowledge) खरेदी करण्याबाबत आपला निर्णय पक्का करा.