उस्मानाबाद | शेतकऱ्याच्या हक्काचे खरीप हंगाम 2020 पिक विम्याचे पैसे मिळवून देण्यासाठी कृषी व महसूल मंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर कृषी आयुक्तांनी तीन दिवसात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशा नोटिसा विमा कंपन्यांना दिल्या. मात्र, शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नाही अखेर शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.
खरीप 2020 मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील नऊ लाख 48 हजार 990 शेतकऱ्यांनी अर्जाद्वारे 640 कोटी रूपये विमा भरून आपली पिके संरक्षित केली होती. मात्र, विमा कंपनीने यापैकी केवळ 79 हजार शेतकऱ्यांना 86 कोटी इतकी तुटपुंजी नुकसान भरपाई दिली.
तांत्रिक मुद्दे समोर करीत पिक विमा कंपनी सरसगट नुकसान भरपाई देत नाही. विमा कंपनीकडून केवळ आश्वासनेच मिळाली यामुळे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे या प्रकरणात आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या वतीने अॅड. श्रीकांत वीर अॅड. सतीश कोळी हे काम पाहत आहेत.