सविता करंजकर जमाले यांच्या ‘युद्ध जवळ आलंय’ या अनुवादित कवितासंग्रहाचे प्रकाशन संपन्न

DH

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| कवयित्री, अनुवादक सविता करंजकर जमाले यांनी अनुवादित केलेल्या ‘युद्ध जवळ आलंय’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा प्रसिद्ध साहित्यिक व मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह डॉ. दादा गोरे यांच्या हस्ते व ज्येष्ठ लेखिका सुनंदा गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला.

हरेक प्राणिमात्राच्या व्यक्तिगत जीवनात अधिक्षेप वाढला असून त्याचा विरोध आता अटळ आहे. कुटुंबव्यवस्थेपासून ते समूहजीवनात देखील दंडेलशाही, पिळवणूक, अत्याचार वाढले असून ती अस्वस्थता युद्ध रूपाने बंड पुकारेल, असे मध्यवर्ती आशयसूत्र घेवून अनुवादित केलेला ‘युद्ध जवळ आलंय’ हा काव्यसंग्रह आहे.

पैठण येथील दखनी स्वराज्य या प्रकाशन संस्थेने हा संग्रह प्रकाशित केला असून, समकालीन महत्त्वाचे कवी संतोष पद्माकर पवार यांची प्रस्तावना या संग्रहाला लाभली आहे. ब्रतोल ब्रेख्त, महेमूद दरवेश, ओम नागर, इव्हान बुनीन, माया एंजलो आदी जगप्रसिद्ध कवींच्या अनुवादित कविता या संग्रहात समाविष्ट आहेत.

”अनुवाद करणे हे अत्यंत जोखमीचे काम आहे. वेगवेगळ्या भाषेतील आशय आणि शब्दकळा जशास तशी टिकवून ठेवत मराठी भाषेच्या वाचकांसाठी ते भावविश्व सांभाळणे कठीण असते, मात्र ते काम सविता करंजकर जमाले यांनी यथार्थपणे पेलले आहे,” असे कौतुकाउद्गार डॉ दादा गोरे यांनी या वेळी बोलताना काढले.

पुढे बोलताना डॉ. गोरे असे म्हणाले की, ”सविता करंजकर यांनी केलेली कवितांची निवड अतिशय उत्तम आहे. कवितेतील विषय मानवाच्या घुसमटींचे विषय आहेत, अन्यायाविरुद्ध बंड करण्याच्या मानसिकतेचे विषय आहेत, अन्याय अत्याचाराविरुद्ध उभे राहण्याचे हे विषय आहेत. एकूणच हा मानवमुक्तीचा लढा आहे आणि म्हणूनच ‘युद्ध जवळ आलंय’ हे या संग्रहाचे शीर्षक मला अतिशय यथार्थ आणि बोलके वाटते.”

यावेळी दखनी स्वराज्य प्रकाशनाचे संतोष तांबे, मराठवाडा साहित्य परिषद शाखा पैठणचे अध्यक्ष अनिल देशमुख, प्राचार्य कैलास मुके, प्राचार्य संदीप काळे, मुख्याध्यापक बजरंग काळे, पत्रकार मदन आव्हाड, पत्रकार महेंद्र नरके, कवयित्री आशा डांगे, प्रा.सविता लोंढे, श्रेयस जमाले यांची उपस्थिती होती. दरम्यान, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मदन आव्हाड यांनी केले, तर बजरंग काळे यांनी आभारप्रदर्शन केले.