Pune Airport : पुणे विमानतळावर बिबट्याचा वावर; मुरलीधर मोहोळ यांनी दिल्या महत्वाच्या सूचना

Pune Airport leopard
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Airport । पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचे विमानतळ असलेले पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ नेहमीच प्रवाशांनी गजबजलेलं असते. या विमानतळावरून दररोज अनेक उड्डाणे होतात. पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी हे विमानतळ म्हणजे जणू वरदानच आहे. मात्र मागच्या काही दिवसांत पुणे विमानतळावर बिबट्याचा वावर आढळून आल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. वन विभागाने अथक परिश्रम घेऊन आणि मोहीम राबवूनही बिबट्या अजूनही हाताला लागलेला नाही. आता केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी याबाबत एक बैठक घेऊन प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या आहेत.

पुणे विमानतळाशी (Pune Airport) संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिका (पीएमसी) अधिकारी, विमानतळ अधिकारी आणि भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक आयोजित केली. यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी म्हंटल कि, बिबट्याला लवकरात लवकर पकडण्यासाठी वन विभाग आणि संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. वन विभागाने बिबट्याने वापरलेल्या धावपट्टीजवळील लपण्याची ठिकाणे बंद केली आहेत. प्रमुख ठिकाणी जाळी आणि पिंजरे देखील बसवण्यात आले आहेत, बिबट्याच्या दिसण्यामुळे विमानतळ परिसरात भीतीचे वातावरण असून, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हंटल.

भटक्या कुत्र्यांची संख्याही वाढली – Pune Airport

आणखी एक बाब म्हणजे, विमानतळावर भटक्या कुत्र्यांची आणि पक्ष्यांची वाढती उपस्थिती विमानांच्या ऑपरेशनमध्ये व्यत्यय आणू लागली आहे. काही दिवसांपूर्वी एका पक्ष्याने विमानाच्या इंजिनला धडक दिल्याची घटना घडली. ज्यामुळे व्यापक सुरक्षा उपाययोजनांची गरज असल्याचे स्पष्ट झालं. अधिकाऱ्यांच्या मते, विमानतळाच्या ५-६ किमीच्या परिघात कचरा टाकल्याने प्राणी आकर्षित होत आहेत. अलिकडच्या सर्वेक्षणात ११ जुने कचरा टाकण्याचे ठिकाण आढळले आहेत, जे आता साफ केले जातील. उड्डाण ऑपरेशन्समध्ये अडथळा येऊ नये म्हणून असे सर्व कचरा क्षेत्रे काढून टाकण्याचे उद्दिष्ट आहे.

वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी, वाहतूक पोलिसांना सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी आणि विमानतळाच्या (Pune Airport) जवळील गर्दी टाळण्यासाठी सविस्तर कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महापालिका आयुक्तांनी सांगितले की, “सुरक्षित आणि अखंडित उड्डाणे सुनिश्चित करणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सर्व विभागांना विलंब न करता आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.