Friday, March 24, 2023

साताऱ्यात पुणे- बेंगलोर ग्रीन फिल्ड हायवे बाधित 60 गावातील शेतकऱ्यांचा मोर्चा

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाला पर्याय म्हणून पुणे- बंगळूर द्रुतगती मार्ग होत आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील पुणे सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यातून जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील खंडाळा , फलटण , कोरेगाव , खटाव या चार तालुक्यातील 60 गावांमधून तो जाणार आहे.. त्यासाठीचे मार्किंग दगड लावण्यात आलेले आहेत. म्हणून या बाधित शेतकऱ्यांच्या वतीने सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.

पुणे बेंगलोर ग्रीन फिल्ड हायवे बाधित शेतकऱ्यांच्या बाधित क्षेत्राला खाजगी वाटाघाटीने एकरी २ कोटी किंवा चालू बाजारभावाच्या दहापट मोबदला मिळावा, बाधित क्षेत्रातील बांधकामे, विहिरी ,बोअरवेल ,पाईपलाईन , फळझाडे , फळबागा यांचे चालू बाजारभावाप्रमाणे योग्य मूल्यांकन करून त्याच्या चारपट मोबदला मिळावा , प्रत्येक गावातील महामार्ग बाधित शेतकऱ्यांना संपूर्ण मोबदला मिळत नाही तोपर्यंत ग्रीनफिल्ड हायवेचे कसलेही काम कुठल्याही बाधित गावच्या हद्दीत सुरू करू नये अशा मागण्या यावेळी करण्यात आली आहे.

- Advertisement -

त्याचप्रमाणे महामार्ग बाधित शेतकऱ्यांना वहिवाटीप्रमाणे निवाडा नोटीस द्यावी, वहिवाट ठरवण्यासाठी शासकीय कमिटी नेमावी , शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच मोजणी करण्यापूर्वी चार दिवस अगोदर बाधित शेतकऱ्यांना लिखित स्वरूपात निरोप द्यावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. जर बाधित शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न करता दडपशाहीने महामार्गाची कसलेही काम सुरू केल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.