पुणे प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या १२५ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर पुण्यातील ३ मतदारसंघातून दुखावलेल्या समर्थकांचा आवाज बाहेर येऊ लागला आहे. कोथरूड, शिवाजीनगर आणि कॅन्टोन्मेंट मतदारसंघात नवीन उमेदवार देण्यात आले आहेत. कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णी यांच्याऐवजी चंद्रकांत पाटील, शिवाजीनगरमध्ये विजय काळे यांच्याऐवजी सिद्धार्थ शिरोळे आणि कॅन्टोन्मेंट मतदारसंघात दिलीप कांबळे यांच्याऐवजी सुनील कांबळे यांना संधी दिल्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. या ठिकाणच्या अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली असून शहर भाजपमधील खदखद समोर आली आहे. अनेक निष्ठावंतांना डावलल्याने नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या सुनील कांबळे यांना कोणत्या निकषावर उमेदवारी देण्यात आली असा संतप्त सवाल अनुसूचित जाती मोर्चाचे पुणे शहर अध्यक्ष डॉ भरत वैरागे यांनी विचारला आहे. तीन मतदारसंघांपैकी कॅन्टोन्मेंट परिसरात भाजपविरोधात वातावरण तापले असून या ठिकाणी काय निर्णय होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.
घराणेशाहीला खतपाणी घालण्याचा हा प्रकार असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. निष्ठावंत २२ उमेदवारांपैकी एकाची निवड करून त्याला निवडणुकीला उभं करण्यात येईल असे डॉ भरत वैरागे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. सुनील कांबळे हे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे बंधू आहेत. दरम्यान पुण्याचे माजी खासदार अनिल शिरोळे यांना यंदाच्या लोकसभेला संधी नाकारताना त्यांच्या मुलाला विधानसभेचं तिकीट मिळेल असं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यानुसार भाजपने कार्यवाही पूर्ण केली आहे. कोथरूडमध्ये तिकीट नाकारलेल्या मेधा कुलकर्णी यांची मनधरणी करण्याचा कोणताही प्रयत्न भाजपने अद्याप केलेला नसून चंद्रकांत पाटलांच्या पुण्यातील कार्यक्रमाचे निमंत्रण कुलकर्णी यांना न दिल्यामुळे त्या आणखी अस्वस्थ झाल्या आहेत. निमंत्रण नसलं तरी आपण कार्यक्रमाला जाणार असल्याचं कुलकर्णी यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं.