Pune Covid Cases : कोरोना रुग्णसंख्येत वाढ; पुण्यात 87 वर्षीय वृद्धाला लागण

Pune Covid Cases
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Covid Cases। महाभयंकर अशा कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही कोरोना रुग्ण सापडला आहे. पुणे शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 87 वर्षीय पुरुषाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आलं आहे. या वर्षातील पुण्यात आढळून आलेला हा पहिलाच कोरोना रुग्ण आहे. खूप दिवसानंतर पुण्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे. तसेच प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आलं आहे.

सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत-

महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचे 56 रुग्ण सक्रिय आहेत. हे सर्व रुग्ण मुंबई महापालिकेच्या हद्दीतील आहेत, तर मुंबई सोडली तर आता फक्त पुण्यातच कोरोनाचा रुग्ण (Pune Covid Cases) सापडला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्यावर मास्क लावायची पाळी तर येणार नाही ना? याची भीती नागरिकांच्या मनात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दक्षिण-पूर्व आशियातील देशांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्याचाच परिणाम भारतावर आणि महाराष्ट्रावर होताना दिसत आहे. या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत कोरोनाचे 87 रुग्ण आढळले होते. त्यापैकी 31 बरे झाले असून सध्या 56 जणांवर घरीच उपचार सुरू आहेत. कोरोना विषाणू सध्याचा सौम्य स्वरूपाचा उपप्रकार असल्याने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दरम्यान, मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या चाचणीत कोरोना व्हायरस आढळला आहे. परंतु, उल्लेखनीय म्हणजे रुग्णालय प्रशासनाच्या मते, कोविड पॉझिटिव्ह असलेल्या ५८ वर्षीय महिलेचा कर्करोगाने मृत्यू झाला तर १३ वर्षीय मुलीचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाला असं म्हंटल जातंय. तरीही दोघींच्याही शरीरात कोरोनाने शिरकाव केला होता हि गोष्ट कोणी नाकारू शकत नाही.

कोरोनाची उत्पत्ती चीनमध्ये – Pune Covid Cases

खरं तर कोरोनाची उत्पत्ती चीनमध्ये 2019 मध्ये झाली आणि 2020 मध्ये संपूर्ण जगभर हा विषाणू पसरला. भारतात तर करोडो नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. अनेकांनी यातून स्वतःचा बचाव केला तर काही रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे लॉक डाउन करण्यात आलं, संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ठप्प पडली होती. 2022 पासून जग हळूहळू पूर्वपदावर आले. परंतु आता हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्यामुळे ही पुन्हा लाट येणार का अशी भीती व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या या नव्या विषाणूचे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.