Pune Crime : 20 लाखांचे 5 कोटी करतो असे सांगत पुण्यातील महिलेला गंडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रक्कम 25 पट करून देतो असे सांगून पुण्यातील एका महिला व्यावसायिकाला 20 लाखांचा गंडा घालत चौघांनी फसवणूक केल्याचा प्रकार (Pune Crime) उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका भोंदूसह 3 साथीदारांविरुद्ध विश्रामबाग पोलीस स्थानकात सदर महिलेने फिर्याद दिली आहे. या घटनेचा तपास सुरू असून संशयित आरोपींना अटक झालेली नाही. 20 लाख रुपयांचे 5 कोटी रुपये करून देण्याचे आमिष आरोपीने महिलेला दिले होते. याप्रकरणी संशयित आरोपी तन्वीर श्यामकांत पाटील, शिवम गुरुजी, सुनील राठोड, आनंदस्वामी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना दि. 9 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर या कालावधीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला नारायण पेठ, पुणे येथे रहात आहे. सदर महिलेचे व्यावसायिक भागीदार अंकितकुमार पांडे यांच्या जमीन खरेदी व्यवहारादरम्यान संशयित आरोपी तन्वीर पाटील याच्याशी ओळख झाली होती. महिलेशी ओळख झाल्यानंतर पाटीलने त्याचे साथीदार शिवम गुरुजी, सुनील राठोड, आनंद स्वामी यांच्याशी महिलेचे व्यावसायिक भागीदार पांडे यांची ओळख करून दिली. संशयित आरोपींनी पांडे आणि त्यांचे परिचित राजपाल जुनेजा आणि फिर्यादी महिलेला वीस लाख रुपयांचे पाच कोटी रुपये करून देतो, असे आमिष दाखविले.

यानंतर दि. 13 सप्टेंबर रोजी संशयित आरोपी महिलेच्या घरी आले. रिकाम्या टाकीत त्यांनी 20 लाख रुपये टाकण्यास सांगितले. त्यानंतर संशयित आरोपींनी खोलीत धूर केला. पंचवीस पट रक्कम हवी असेल तर हरिद्वार येथे विधी करावा लागेल, अशी बतावणी संशयित आरोपींनी केली. यानंतर टाकीतील 20 लाख रुपये घेऊन संशयित आरोपी पसार झाले. नंतर महिलेने जेव्हा त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा संशयित आरोपींनी प्रतिसाद दिला नाही. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून उपनिरीक्षक बहुरे अधिक तपास करत आहेत.