Tuesday, January 7, 2025

Pune Helicopter Crash : पुण्यात हेलिकॉप्टर कोसळलं!! 3 जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातील बावधन या डोंगराळ भागात हेलिकॉप्टर क्रॅश (Pune Helicopter Crash) झालं आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे हेलिकॉप्टर कोसळण्याच्या आल्याचे सांगितल जात आहे. मात्र दुर्दैवाने या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. यात २ पायलट आणि एका इंजिनीअर चा समावेश आहे. परिसरात तुटलेल्या हेलिकॉप्टरचे सांगाडे पसरले आहेत. घटनास्थळी पोलिसांचे पथक तातडीने रवाना झालं असून हे हेलिकॉप्टर कशामुळे कोसळलं याचा शोध सुरु आहे. महत्वाची बाब म्हणजे मुंबईतून सुतारवाडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे हे याच हेलिकॉप्टर मधून प्रवास करणार होते मात्र त्यापूर्वीच हे हेलिकॉप्टर कोसळलं.

3 मिनिटातच हेलिकॉप्टर कोसळले – Pune Helicopter Crash

याबाबत अधिक माहिती अशी कि, पुण्याच्या बावधन बुद्रुक परिसरातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टवरच्या हेलिपॅडवरुन हेलिकॉप्टरने उड्डाण केलं होते, मात्र थोड्याच अंतरावर जाऊन ते कोसळलं. सकाळच्या सुमारास डोंगराळ भागात धुके असलेल्या हे हेलिकॉप्टर कोसळले (Pune Helicopter Crash) असल्याची शक्यता वर्तवण्यात आहे. या हेलिकॉप्टर मध्ये २ पायलट आणि १ इंजिनिअर असे एकूण ३ व्यक्ती होते, या तिघांचाही या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.अपघातानंतर ग्रामस्थांनी हिंजवडी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर पोलीस आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

दरम्यान, यापूर्वी सुद्धा २४ ऑगस्ट रोजी अशाच प्रकारची हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना पुण्यात घडली होती. त्यावेळी पुण्यातील पौड परिसरात हेलिकॉप्टर कोसळले होते. हे हेलिकॉप्टर मुंबईहून हैदराबादला जात होते. त्यात एक पायलट आणि तीन प्रवासी होते. या अपघातात पायलट जखमी झाला. तर बाकीच्या तिघाना मात्र कोणतीही गंभीर दुखापत झाली नव्हती. मात्र आजच्या हेलिकॉप्टर अपघातात ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.