Pune Metro : राज्यातील दुसरे महत्वाचे शहर म्हणजे पुणे. पुणे आता झपाट्याने विकसित होत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागातून नागरिक येथे शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने येऊन वसले आहेत. त्यामुळे पुण्याच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. परिणामी पुण्याच्या वाहतुकीतही वाढ झाली आहे. त्यातही सार्वजनिक वाहतुकीमध्ये बस आणि मेट्रो हे दोन्ही घटक महत्वाची भूमिका बजावत आहेत.
नव्याने सुरु झालेल्या मेट्रोला पुणेकरांनी चांगलीच पसंती दर्शवली असून कार्यालयीन वेळेत मेट्रोच्या काही मार्गांवर गर्दी पहायला मिळते. म्हणूनच आता पुणे मेट्रोच्या दोन महत्वाच्या मार्गांवर मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांची नक्कीच मोठी सोय होणार (Pune Metro) आहे.
दर 7 मिनिटांनी मेट्रो
सध्या पुणे शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट यापैकी पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी हे 2 मेट्रो मार्ग सुरू आहेत. या दोन्ही मार्गावरील मेट्रोला पुणेकरांची गर्दी पाहायला मिळते. पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गांवर मेट्रो सेवेच्या फेऱ्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. आधी या दोन्ही मार्गांवर सकाळी व सायंकाळी जास्त गर्दी असण्याऱ्या वेळेत प्रत्येक साडेसात मिनिटांनी मेट्रो उपलब्ध होत असे. सकाळी ८ ते ११ व दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत दोन्ही मार्गिकांवरील मेट्रोची वारंवारिता ७.५ मिनिट होती. पण आता ही वारंवारिता ७ मिनिटे करण्यात आली आहे. म्हणजे आता प्रवाशांसाठी दर ७ मिनिटाला मेट्रो उपलब्ध होणार आहे.
मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ
पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट या मार्गावर 113 ऐवजी आता 117 मेट्रोच्या फेऱ्या होणार आहेत. तसेच वनाज ते रामवाडी या मार्गावर 114 ऐवजी 118 मेट्रोच्या फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे कार्यालयीन वेळेत मेट्रोने ये-जा करणाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
येरवडा मेट्रो स्थानक सुरु
वनाज ते रामवाडी मेट्रोमार्गावरील येरवडा मेट्रो स्थानकाचे काम आता पूर्ण झालं असून दिनांक 21 ऑगस्ट पासून येरवडा स्थानक सुरू करण्यात आले आहे त्यामुळे पुणेकरांना या सेवेचा आज पासून लाभ घेता येणार आहे. पुण्यातील इतर मेट्रोस्थानाकांप्रमाणेच येरवड्यातील आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना आता मेट्रोचा लाभ घेता येणार आहे. सध्याची पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या पाहता मेट्रोला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो आहे. पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. येरवडा मेट्रोस्थानक प्रवाशांसाठी खुले करण्यात आल्यामुळे (Pune Metro) वनाज ते रामवाडी पर्यंतची मेट्रो लाईन पूर्णपणे कार्यान्वित होत आहे.