Pune Metro : राज्यातील दुसरे महत्वाचे शहर म्हणजे पुणे. पुणे आता झपाट्याने विकसित होत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागातून नागरिक येथे शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने येऊन वसले आहेत. त्यामुळे पुण्याच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. परिणामी पुण्याच्या वाहतुकीतही वाढ झाली आहे. त्यातही सार्वजनिक वाहतुकीमध्ये बस आणि मेट्रो हे दोन्ही घटक महत्वाची भूमिका बजावत आहेत. नव्याने सुरु झालेल्या मेट्रोला पुणेकरांनी चांगलीच पसंती दर्शवली असून कार्यालयीन वेळेत मेट्रोच्या काही मार्गांवर गर्दी पहायला मिळते.
नव्या वर्षात मेट्रो मालामाल
नव्या वर्षात पुणे मेट्रोला पुणेकर चांगली पसंती देताना दिसत आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या सात दिवसातच पुणे मेट्रोच्या प्रवाशांची संख्या तब्बल पाच लाखांच्या वर गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या सात दिवसात 85 लाखांच्यावर मेट्रोचे उत्पन्न झाले आहे. स्वारगेट पर्यंत मेट्रो झाल्यानंतर नागरिकांना आता पुण्यात मध्ये प्रवास करणं सोपं झालंय.
अगदी पिंपरी चिंचवड, स्वारगेट पर्यंत मेट्रोची व्यवस्था झाल्याने शहरातील नागरिकांना पुण्यात कमी वेळात जाता येते. शिवाय या मेट्रो सेवेचा दररोज नोकरी करणाऱ्यांना देखील मोठा फायदा होतो आहे. पुणे मेट्रोच्या पिंपरी ते स्वारगेट या मार्गावर वर्षाच्या पहिल्याच आठवड्यातील ७ दिवसात पाच लाख प्रवाशांनी प्रवास केलाय. तर या मार्गिकेवर एकूण 84 लाख 90 हजार 434 प्रवाशांनी प्रवास केला असल्याची नोंद आहे. पहिल्या दिवशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे 1 जानेवारीला तब्बल 1 लाख 2,883 प्रवाशांची नोंद झाली असून त्या माध्यमातून मेट्रो व्यवस्थेला 19 लाख 34 हजार 904 रुपयांचं उत्पन्न एका दिवसात प्राप्त झाले आहे.
मेट्रो सेवा रात्री 11 वाजेपर्यंत
पुण्यातील मेट्रो सेवा जानेवारी 2025 अखेर रात्री 11 वाजेपर्यंत त्यांचे कामकाजाचे तास वाढवणार आहेत. सध्या, वनाझ-रामवाडी आणि पिंपरी-स्वारगेट कॉरिडॉर या दोन्ही मार्गावरील शेवटच्या (Pune Metro) गाड्या रात्री १० वाजता सुटतात. रात्री उशिरा कामावरून येणाऱ्या तसेच रात्री उशिरा रेल्वे आणि विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपल्या घरी पोहचता यावे या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे. या बदलामुळे दोन्ही मार्गांवर रात्री 10 नंतर सहा अतिरिक्त ट्रिप जोडल्या जातील, 10 मिनिटांच्या वारंवारतेने चालतील. याचा फायदा रात्री उशिरा जाणाऱ्या प्रवाशांना होईल, त्यामुळे अधिक सुविधा मिळतील आणि प्रतीक्षा वेळ (Pune Metro) कमी होईल अशी अपेक्षा आहे.