पुणे । कोरोनाच्या लढाईत पुणे पोलीस दलाला आज दुसरा धक्का बसला आहे. पुणे पोलीस दलातील वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या ४३ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा आज करोनानं मृत्यू झाला. पुणे पोलीस दलातील हा दुसरा बळी ठरला आहे. १० मे पासून त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधित पोलीस कॉन्स्टेबलला एका खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दरम्यान, मंगळवारी सकाळी त्यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. आतापर्यंत पुणे पोलीस दलातील किमान २६ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. त्यातील १४ पोलीस बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत २ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. पुणे पोलीस दलातील हा दुसरा बळी आहे. या महिन्याच्या सुरुवातीला ५७ वर्षीय पोलीस अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.
कोरोनाविरोधातील लढ्यात पोलीस दलातील योद्ध्यांना कोरोनानं विळखा घातला आहे. राज्यभरातील हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मुंबई पोलीस दलातील करोनाबाधितांची संख्या अधिक आहे. कालच मुंबई पोलीस दलातील २ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळं मृत्यू झाला असून आतापर्यंत मुंबईत १० पोलिसांचा कोरोनानं बळी घेतला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.