Pune Porsche Accident : पोर्श कार अपघात! आजोबांचं छोटा राजन कनेक्शन… ‘पुणे टू दुबई ‘

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माझा मुलगा मला परत द्या… माझा मुलगा मला सोडून गेला त्याची काय चूक होती. मेरा बच्चा अच्छा था… असा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश आहे पुण्यातील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात (Pune Porsche Accident) बळी गेलेल्या अनिस अवधियाच्या आईचा… अश्विनी आणि अनिस या दोन होतकरू तरुणांचा श्रीमंत बापाच्या बारावी पास झालेल्या अल्पवयीन मुलानं मद्याधुंद अवस्थेत चिरडून जीव घेतला… अशांची पाचर बसवायची सोडून प्रशासनानं त्याची 14 तासांच्या आत जामिनावर सुटका केली… आरोपीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तिथल्याच एका स्थानिक लोकप्रतिनिधीनं प्रयत्न केल्याच्याही बातम्या फुटल्या… आरोपीला पोलिस स्टेशनमध्ये पिझ्झा घेऊन जाणं असो… की निकालात दोन निर्दोष व्यक्तींचा जीव घेतल्याबद्दल निबंध लिहिण्याची दिलेली शिक्षा यामुळे सोशल मिडियापासून ते राजकारणात याचे पडसाद उमटू लागले… रवींद्र धंगेकर, मुरलीधर मोहोळ, देवेंद्र फडणवीस आणि थेट राहुल गांधी यांनी या प्रकरणावर बोट ठेवल्याने यंत्रणा कामाला लागली…

दारू पितो हे आपल्या वडिलांना माहिती होतं- Pune Porsche Accident

वाहन कायद्याच्या कलम 185 अंतर्गत नव्यानं गुन्हा दाखल होऊन पुन्हा याची कोर्टात सुनावणी सुरू आहे…अल्पवयीन मुलानं कोझी किचन या हॉटेलमध्ये भरलेलं 48 हजार रुपयांचं बील ज्युविनाईल कोर्टासमोर सादर करण्यात आलं..ज्यामध्ये या मुलानं दारूसाठी पैसे मोजल्याचा उल्लेख आहे. त्याचबरोबर हा मुलगा दारू पित असल्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांकडून जुव्हीनाईल कोर्टात सादर करण्यात आलं… मात्र, हा मुलगा दारू प्यायलेला होता की नाही, यासाठी सर्वात भक्कम पुरावा असणारा ब्लड रिपोर्ट अजून न आल्याने या प्रकरणात कोण तरी हस्तक्षेप करतोय, हे बोललं जाऊ लागलंय… विशाल अग्रवाल यांच्यावर या आधी देखील काही गुन्हे दाखल आहेत… आपण दारू पितो हे आपल्या वडिलांना माहिती होतं, त्यांच्या संमतीनेच आपण गाडी पार्टीला घेऊन गेलो होतो. असं पोलिसांना आधीच सांगितल्याने विशाल अग्रवाल यांच्या बाप असण्याच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालय… हे कमी होतं की काय म्हणून ज्यांनी या अल्पवयीन मुलाचा जामीन मंजूर केला त्याच्या आजोबांनी आम्ही आमच्या नातूला व्यसनांपासून लांब ठेवू, त्याला इथून पुढे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या शिक्षणात व्यस्त ठेवू. असा जबाब दिला… पण ज्या आजोबांनी आपल्या नातूच्या सुधारण्याची हमी घेतली. त्याच आजोबांचे छोटा राजनसोबत कनेक्शन असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानं आता अग्रवाल कुटुंबाच्या अडचणी वाढल्या आहेत…

Pune Porsche Accident : Vedant आणि Vishal Agrawal यांना शिक्षा होणार का? आजोबांच छोटा राजन कनेक्शन

आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालने डॉन छोटा राजनला तत्कालीन नगरसेवक अजय भोसले यांची 2009 मध्ये हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती…. सध्या शिंदेंच्या शिवसेनेच्या सह संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अजय भोसलेंनी आरोपीच्या आजोबांची आणि अग्रवाल कुटुंबाची सारी कुंडकीच बाहेर काढली… ते म्हणाले की , संपूर्ण अग्रवाल फॅमिलीच क्रिमिनल आहे… प्रत्येकावर किमान एक-दोन केसेस आहेत… धमकी, दमदाटी करून पैसे देऊन ते न्याय विकत घ्यायला पाहतात…यासोबत त्यांनी 2009 च्या घटनेचा किस्साही सांगितला…2009 मध्ये वडगावशेरीमधून आमदारकीसाठी भोसले उभे होते. राम अग्रवाल यांच्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. राम अग्रवाल हे आरोपीच्या आजोबांचे म्हणजेच सुरेंद्रकुमार अग्रवाल यांचे सख्खे बंधू… त्यावेळी छोटा राजनचे अनेक फोन दोन भावांच्या भांडणातून भोसलेंना येत होते. हजारो कोटींचा हा वाद होता. राम अग्रवाल एस .के. अग्रवालला पैसे देत नव्हता. एसके अग्रवालने दुबईला जाऊन त्यासाठी छोटा राजन यांची भेटही घेतली होती… छोटा राजनला राम अग्रवाल हा अनिल भोसले याचा खास मित्र असल्याचं सांगितलं होतं. त्यातून भोसलेंची छोटा राजनला सुपारी देण्यात आली… गोळीबार करण्यात आला…जर्मनी बेकरीजवळ झालेल्या या गोळीबारात शार्प शूटर यांनी सुरेंद्र कुमार अग्रवाल आणि छोटा राजन यांची नावही घेतली होती…

छोटा राजनला भारतात आल्यानंतर त्याच्यावरील आरोपांचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला… पण एस. के. अग्रवाल यांच्या केस मुद्धामहून लांबवण्यात आली… असाही त्यांचा आरोप आहे…पोलिसांकडे मोठी अफरातफर करून प्रकरण दाबायचे हा त्यांचा धंदा असल्याचा आरोपही भोसले यांनी आरोपीच्या आजोबांवर केला आहे… थोडक्यात काय तर नातवाच्या करामतीमुळे आजोबांनी दाबलेली जुनी पुरानी प्रकरणही यानिमित्ताने बाहेर आली आहेत… पुणे सत्र न्यायालयाने आज विशाल अग्रवालसह बार मालक, व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश गावकरे यांना तीन दिवसांसाठी पोलीस कोठडीत पाठवलंय… पण आरोपीच्या आजोबांच्या या अंडरवर्ड कनेक्शनचाही पोलीस तपास करणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे… आम्ही या घटनेचे (Pune Porsche Accident) लाईव्ह अपडेट्स देऊच…पण सध्या ?चर्चेत असणारी ही बातमी काही दिवसांनी पैशांचा पाऊस पाडून चर्चेतून गायब होऊ नये, म्हणजे मिळवली… बाकी पुण्यातल्या या हायव्होल्टेज अपघात प्रकरणावर तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा?