मंगेशकर रुग्णालयात नक्की काय घडले ? रक्तस्राव होत असतानाही उपचार दिले नाहीत, नातेवाईकांचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती तनिषा भिसे यांच्या उपचारावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. भिसे कुटुंबीयांचा आरोप आहे की, रुग्णालयाने उपचारांसाठी दहा लाखांची मागणी केली होती. पैशांची व्यवस्था न करता उपचार न दिल्यामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला, असा त्यांचा दावा आहे. या घटनेमुळे पुणे आणि राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णालय प्रशासनाने कुटुंबाच्या आरोपांचा प्रतिवाद करत चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे.

तनिषा भिसे यांच्या पती सुशांत भिसे भाजपाचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक आहेत. आमदार गोरखे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला असून, रुग्णालय प्रशासनाला विनंती केली, परंतु तरीही रुग्णालयाने उपचार सुरू केले नाहीत. अशी माहिती समोर येत आहे.

सुशांत भिसे यांच्या बहिणी प्रियांका पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आम्ही सकाळी ९ वाजता मंगशेकर रुग्णालयात गेलो. तिथे डॉक्टर घैसास यांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर बीपी वाढल्याचे सांगितले. तिथून त्यांनी नव्या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर वहिनीला शिफ्ट करण्यास सांगितले. तिथे असेसमेंट रुममध्ये दुसरे डॉक्टर आले. त्यांनी परिस्थिती गंभीर असल्याची जाणीव करून दिली. सिझर करावे लागेल, त्यामुळे काही खाऊ-पिऊ नका, असे सांगितले. सिझरची तयारीही त्यांनी केली, रुग्णाचे कपडे घालायला दिले. त्यानंतर डॉक्टर घैसास आले, त्यांनी परिस्थिती गंभीर असल्याचे म्हटले. रक्तस्राव होत असल्यामुळे लगेचच शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगितले.प्रियांका पाटील म्हणाल्या, “सातव्या महिन्यात प्रसूती होत असल्यामुळे बाळांना NICU मध्ये ठेवावे लागेल, असे सांगितले. दोन्ही बाळांचा प्रत्येकी दहा लाख असा वीस लाखांचा खर्च होईल, असेही ते म्हणाले. मात्र आम्ही विनंती केल्यानंतर त्यांनी दहा लाख आता भरण्यास सांगितले. पैसे भरणे शक्य नसल्यास तुम्ही ससूनला जाऊन उपचार घेऊ शकता, असेही म्हटले. हे सर्व आमची वहिणी तनिशा भिसे यांच्यासमोरच सांगितल्यामुळे वहिणीच्या मनावर दबाव आला. आधीच रक्तस्राव, उच्च रक्तदाब असल्यामुळे वहिनीची परिस्थिती नाजूक होती, त्याच खर्चाचा आकडा पाहून ती अशरक्षः कोसळली. वहिनी तिथेच रडायला लागली.”

आम्ही पैशांची व्यवस्था करतो, अशी विनंती वारंवार करत होतो. रुग्णाच्या मनाला समाधान मिळेल यासाठी तरी उपचार सुरू करा, असेही म्हणालो. पण रुग्णालयाने रस्तस्राव थांबविण्याचा प्रयत्न केला नाही. आधीच्या रुग्णालयातून मिळालेली गोळीच खा, असे उत्तर दिले.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, या प्रकरणाची चौकशी केली जात आहे आणि रुग्णालयाच्या वतीने सर्व माहिती संबंधित यंत्रणांना दिली जाईल.