हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाने अक्षरशा थैमान घातलं आहे. राज्यात ठिकठिकाणी पावसाने जोरदार बॅटिंग केली असून अनेक भागात पाणी साचल्याचा प्रकार समोर आला आहे. यातून विद्येचे माहेरघर असलेलं पुणेही (Pune Rain) सुटलं नाही. पहिल्याच पावसात पुण्यातील रस्त्यावर पाणी तुंबुन प्रचंड वाहतुक कोंडी पहायला मिळाली. सर्वसामान्य प्रवाशांच्या वाहतुकीचा खोळंबा झाला. या घटनेचा निषेध म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गजेंद्र मोरे (Gajendra More) यांनी मांजरी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात होडी आंदोलन (Boat movement) केलं. या अनोख्या आंदोलनाने सर्वांचं लक्ष्य वेधलं.
अवकाळी पावसाने पुण्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याच पाहायला मिळालं. रस्त्यावर पाणी आल्याने वाहन चालकांची चांगलीच दमछाक झाली. मान्सूनपूर्व पावसाने प्रशासनाने राबविलेल्या पावसपूर्व कामांची जणू पोल खोलच केली. पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या कामाचा पूरता बोजवारा उडल्याचे पाहायला मिळालं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते गजेंद्र बाबा मोरे यांनी होडी आंदोलन करून सर्वांचं लक्ष्य वेधलं. गजेंद्र बाबा मोरे यांनी मांजरी येथे प्रशासनाच्या निषेध नोंदविण्यासाठी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात होडी चालवून होडी आंदोलन केले. महापालिका आणि पीएमआरडीच्या निषेधार्थ हे होडी आंदोलन करण्यात आले. या अनोख्या आंदोलनाने प्रशासन आता तरी जाग होते का ते बघायला हवं.
दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत असल्यानं त्याचा प्रभाव मुंबईसह महाराष्ट्रात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रावर दिसणार आहे. त्यामुळं येत्या 22 मे ते 24 मे या कालावधीत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तळकोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली कोल्हापूरातील घाटमाथ्यावरही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग या जिल्ह्यांत नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पुढच्या 48 तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा (Maharashtra Rain) हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.




