Pune Rain Update । गेल्या काही तासांपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी वरुणराजा धो- धो कोसळत आहे. खास करून पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. आज हवामान विभागाकडून पुणे, साताऱ्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. आज म्हणजेच रविवारी याठिकाणी २०४ मिलीमीटर पेक्षाही जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाने दिले आहेत.
नागरिकांनी नदीपात्रात उतरु नये – Pune Rain Update
पुण्यातील खडकवासला धरण (Khadakwasla Dam) साखळी क्षेत्रात गेल्या काही तासांमध्ये रिमझिम पाऊस (Pune Rain Update) सुरु आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून खडकवासला धरणातून सध्या मुठा नदीच्या पात्रात वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास खडकवासला धरणातून साधारण 35,310 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु होता. आज सकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने खडकवासलातून पाणी सोडण्याचा वेग २३ १२२ क्युसेक्सपर्यंत कमी करण्यात आला. तरीही नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिलेत आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरु नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. येत्या काही तासांत पावसाचा जोर वाढल्यास खडकवासलातून पाणी सोडण्याचा वेग वाढवला जाईल, अशी माहितीही देण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यात आणखी तीन ते चार दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा वगळता बहुतांश भागात गुरूवारपर्यंत वरुणराजा धो धो कोसळेल असा अंदाज आहे. हवामान विभागाने पुणे, सातारा, रायगड या ३ जिल्ह्याना रेड अलर्ट दिला आहे तर पालघर, जळगाव, नाशिक, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात आज मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.