Pune Rape Case: अटक होण्याच्या भीतीने आरोपीकडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न; आरोग्य तपासणीत खुलासा

0
28
Pune Rape Case
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune Rape Case| पुण्यातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी दत्तात्रय गाडेला अखेर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. काल मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी गुप्त मोहिमेद्वारे त्याला शेतातून ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी १३ स्वतंत्र पथके तयार केली होती. मात्र, तपास सुरू असल्याची कुणकुण लागताच तो आपल्या गावात लपून राहिला. त्यामुळे पोलिसांनी शोधमोहीम अधिक खुलेपणाने राबवण्याचा निर्णय घेतला. शेवटी, मध्यरात्रीच्या सुमारास एका शेतातून त्याला अटक करण्यात आली.

त्यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण ऑपरेशनची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “आरोपी गावात असल्याचा संशय होता, मात्र तो सतत पळ काढत होता. शेवटी आम्ही ओपन ऑपरेशन हाती घेतले आणि त्याला पकडण्यात यश आले.” पुढे आयुक्त म्हणाले की, “दत्तात्रय गाडे हा पूर्वीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. २०१९ मध्ये त्याच्यावर सहा गुन्हे दाखल झाले होते. २२ जानेवारी २०२४ रोजी मोबाईल चोरीचा गुन्हा त्याच्या नावावर नोंदवण्यात आला होता.”

आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न? (Pune Rape Case)

दत्तात्रय गाडेला अटक केल्यानंतर आज पहाटे त्याची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. तेव्हा त्याच्या गळ्यावर काही व्रण आढळले. त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने दोरीच्या साहाय्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र दोरी तुटल्याने तो बचावला. काही स्थानिकांनी त्याला घटनास्थळी जाऊन वाचवल्याचेही सांगण्यात येत आहे.

महिला सुरक्षेसाठी काय उपाय?(Pune Rape Case)

या धक्कादायक घटनेनंतर पुण्यात महिला सुरक्षेच्या उपाययोजनांवर अधिक भर दिला जाणार आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, शहरातील सार्वजनिक वाहतुकीत महिला सुरक्षेसाठी नव्या योजना आखल्या जात आहेत. तसेच, संवेदनशील ठिकाणी गस्त वाढवण्यात येणार आहे. आरोपीला अटक झाली असली तरी अशा घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी पोलिसांकडून ठोस पावले उचलली जाणार आहेत.