हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Solapur Highway । सोलापूरहुन पुण्याला नोकरीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पुणे- सोलापूर महामार्गावर मोठी गर्दी असते. परिणामी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मात्र आता पुणे ते सोलापूर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची माहिती समोर येत आहे. पुणे- सोलापूर महामार्गावरील दीर्घकालीन वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे. राज्य मंत्रिमंडळाने हडपसर आणि यवत दरम्यान ५,२६२ कोटी रुपयांच्या सहा पदरी उड्डाणपुलाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. यामुळे रोजच्या प्रवाशांना कायमस्वरूपी दिलासा मिळणार आहे.
३ वर्षांच्या आत प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित- Pune Solapur Highway
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपसचिव प्रज्ञा वाळके यांनी याबाबतच शासन निर्णय जारी करत माहिती दिली आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC ) द्वारे राबविला जाईल आणि बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर (BOT ) मॉडेलवर पूर्ण केला जाईल. एकदा का हा प्रोजेक्ट पूर्ण झाला कि मग सर्व गाडयांना टोल आकारण्यात येईल. प्रकल्पासाठी भूसंपादन करण्याची जबाबदारी पायाभूत सुविधा मंडळाकडे देण्यात आली आहे. उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर ३ वर्षांच्या आत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. सद्यस्थितीत असलेल्या पुणे सोलापूर रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार असून हा रस्तादेखील सहा पदरी करण्यात येणार आहे. हे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या महामार्गावरील (Pune Solapur Highway) वाहतुकीची कोंडी सुटणार आहे. या सर्व प्रकल्पासाठी 5 हजार 262 कोटींच्या खर्चासही शासनाने मान्यता दिली आहे.
सध्या कोणत्या भागात वाहतूक कोंडी होतेय?
सध्या हडपसर बस डेपो परिसरात दुपदरी उड्डाणपूल असला तरी मांजरी फाटा, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर, थेऊर फाटा आणि उरुळी कांचन येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी बघायला मिळते. परिणामी उरुळी कांचन येथे, शिंदेवणे घाटातून उतरणाऱ्या वाहतुकीचा ताण आणखी वाढतो आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर येतो. आता मात्र थेट यवत पर्यंत ६ पदरी उड्डाणपूल तयार झाल्यास, वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि प्रवाशांना कोणत्याही कटकटी शिवाय प्रवास करता येईल. पुणे ते सोलापूर (Pune Solapur Highway) अंतर आणखी जवळ होण्यास मदत होईल.