हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे शहरातील सहा विधानसभा मतदारसंघ (Pune Vidhan Sabha) … इथे जाळ अन् धूर संगटच निघताना दिसतो… याच पुण्यात कसब्याचा बालेकिल्ला फोडण्याची किमया रवींद्र धंगेकरांनी केली…. चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरातून येऊन इथं बस्तान बांधलं… तर माधुरी मिसाळ यांनी सलग तीन टर्म भाजपच्या तिकिटावर शहरी मतदारसंघातून निवडून जाण्याची किमया केली… लोकसभेला कसब्याच्या धक्क्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी खासदार होत भाजपला पुन्हा एकदा शहरात पॉलिटिकल स्कोप मिळवून दिला… जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघातून मोहोळांना पर्यायाने भाजपला लीड आहे… पण लोकसभेचं कट टू कट गणित विधानसभेलाही पाहायला मिळेल का? पर्वती, शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट बोर्ड ते कसब्यासारख्या हाय व्होल्टेज मतदारसंघात यंदा आमदारकीला कोण गुलाल उधळतय? पुणे शहरातील ६ विधानसभा मतदारसंघातील चालू राजकारणाचा आणि संभाव्य आमदारांचा हा इंडेप्थ आढावा…
पुणे शहराचा आढावा घेताना सर्वात पहिला विचार करावा लागतो तो कोथरूड विधानसभेचा… 2014 ला शिवसेना आणि भाजप वेगवेगळी लढली… भाजपच्या बाजूने वारं होतच… तेव्हा मेधा कुलकर्णी त्यांनी आमदारकीचा गुलाल कपाळाला लावत कोथरूड मध्ये फक्त भाजपच! हे जणू ठासून सांगितलं… नंतर चंद्रकांत पाटलांना लॉन्च करण्यासाठी हा मतदारसंघ निवडल्याने स्टँडिंग आमदार असूनही तिकीट कापल्याने कुलकर्णी नाराज झाल्या होत्या… 2019 ला चंद्रकांत पाटलांना मनसेच्या किशोर शिंदेंनी कडवी झुंज दिली… निवडणूक झाली… निकाल लागला… चंद्रकांत पाटील जिंकले देखील… पण लीड होतं अवघं 25 हजारांचं…पण सध्या भाजपसाठी परिस्थिती तशी ओके आहे… मेधा कुलकर्णी यांची वर्णी राज्यसभेवर केल्यानं पारंपारिक ब्राह्मण मतदार पुन्हा भाजपच्या पाठीशी आला… म्हणूनच लोकसभेच्या निकालात एकट्या कोथरूडनं 74 हजार मतांची मोठी आघाडी दिली… हा आकडा सांगून देतोय की कोथरूडकर आजही भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत… बाकी चंद्रकांत मोकाटे यांनी ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत … मात्र चंद्रकांत पाटलांसोबत यंदा खासदार मुरलीधर मोहोळ यांचीही ताकद लागल्यानं भाजपच इथे सध्या तरी प्लस मध्ये दिसतेय…
दुसरा विधानसभा मतदारसंघ शिवाजीनगरचा…युतीचा हा पारंपारिक बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.. 2019 ला भाजपने इथे पहिल्यांदाच सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर विश्वास टाकत त्यांना उमेदवारी दिली… पण अवघ्या 5000 च्या तूटपुंज्या लीडनं त्यांचा विजय झाला… नंतर भाजप आणि शिरोळ यांनी मतदारसंघावर पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी पाच वर्षात बरीच कामे केली आहेत… स्वतः आमदार साहेब शिरोळे यांनी मोहोळांच्या पाठीशी निर्णायक लीड देईल, असं बोलून दाखवलं होतं… पण त्यांना मिळालं अवघं 4 हजारांचं मताधिक्य… थोडक्यात सिद्धार्थ शिरोळे यांची शिवाजीनगरची आमदारकी धोक्यात आहे… काँग्रेसकडून शिवाजीनगरमधून दत्ता बहिरट हे येणाऱ्या विधानसभेला इच्छुक आहेत.. दलित – मुस्लिम आणि काँग्रेसचा पारंपारिक वोटर हा यंदा काँग्रेसच्या पाठीशी असल्याने आणि त्यातही वंचित इफेक्ट यंदा विधानसभेला मारक ठरणार नसल्याने मतदार संघातून काँग्रेसला विजयाचे चान्सेस जास्त आहेत…
तिसरा मतदारसंघ येतो तो पर्वतीचा…2009 ला या मतदारसंघाच्या निर्मितीपासूनच भाजपने इथं आपला दबदबा कायम ठेवला… भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्यावर पर्वतीच्या मतदारांनी डोळेझाक विश्वास ठेवला… म्हणूनच सलग तीन टर्म निवडून येण्याचा… आमदारकीची हॅट्रिक करण्याचा… बहुमान त्यांना मिळाला… सलग तीन टर्म निवडून आल्यामुळे त्यांचा मतदारसंघावर चांगला होल्ड आहे, मार्केट यार्ड शांतीनगर , बिबवेवाडी सिटी प्राईड स्वारगेट हा मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय मतदार हा नेहमी भाजपच्या बाजूने राहिलाय… एकट्या पर्वती विधानसभेतून 27 पैकी तब्बल 23 नगरसेवक एकदा भाजपचे आहेत… पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा मतदारसंघातील जनतेशी कनेक्ट नसतो, अशी ओरड नेहमीच मतदार संघातून होत असते…. त्यातही झोपडपट्टी पुनर्वसन, सिंहगड रस्त्यावरील कोंडी, पर्वती – तळजाई, जनता वसाहत या भल्या मोठ्या पट्ट्यात मूलभूत प्रश्न जसेच्या तसे आहेत.. मात्र असं असूनही लोकसभेला मोहोळांना मिळालेलं तीस हजारांचे लीड पाहता भाजपचा उमेदवार सेफ झोनमध्ये आहे… फक्त श्रीनाथ भिमाले यांनी भाजपामध्येच उमेदवारीसाठी थोपटलेले दंड पाहता इथे बंडखोरीची दाट शक्यता आहे… महाविकास आघाडीकडून या मतदारसंघातून परंपरेप्रमाणे राष्ट्रवादी लढत देत आलीये… पण काँग्रेसचे आबा बागुल पर्वतीच्या जागेसाठी आग्रही आहेत… त्यामुळे पर्वतीत यंदा इंटरेस्टिंग निकाल पाहायला मिळू शकतो…
चौथा मतदारसंघ येतो तो कसब्याचा…भाजपच्या बालेकिल्लाला सुरुंग लावून विजय मिळवल्याने रवींद्र धंगेकर आणि कसबा विधानसभा ही दोन्ही नाव उभ्या महाराष्ट्राला माहीत झाली… त्यानंतर धंगेकरांनी लोकसभा निवडणुकीतही अपयशी का होईना, पण कडवी झुंज दिल्याने आणि नंतरच्या पोर्शे कार पासून ससून पर्यंत आवाज उठवल्याने… आणि मतदार संघात अनेक कामं मार्गी लावल्याने मविआकडून तेच उमेदवार असतील… दुसऱ्या बाजूला महायुतीत मात्र भाजपमध्येच तिघांनी उमेदवारीसाठी दंड थोपटले आहेत.. टिळक यांचे चिरंजीव कुणाल हे स्पर्धेत उतरले आहेत. त्यातच गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट यादेखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. हेमंत रासने यांनीही पुन्हा उमेदवारी मिळेल, या आशेने आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. त्यामुळे कसबा पेठ जिंकण्यासाठी व्यूहरचना करण्याआधी भाजपला उमेदवार निश्चित करावा लागणार आहे, एवढं नक्की… पण सध्या तरी धंगेकर येथे प्लस मध्ये दिसतायत…
पाचवा मतदारसंघ येतो तो पुणे कॅन्टोन्मेंट…सध्या भाजपचे सुनील कांबळे हे इथले विद्यमान आमदार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या रमेश बागवे यांचा पराभव केला होता. काही दिवसांपूर्वी एका सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण आणि एका महिलेशी फोनवर अर्वाच्य भाषेत बोलल्याची त्यांची क्लिपमुळे ते अडचणीत सापडले होते. पण नगरसेवक पदाच्या काळात केलेल्या कामांमुळे शहरातील समस्यांची जाण असलेला नेता म्हणून कांबळे यांची ओळख आहे. शिवाय महायुती सरकारच्या काळात मिळालेल्या निधीमुळे मतदारसंघात त्यांनी बरीचशी कामंही केलेली आहेत. बाकी त्यांच्या विरोधात रमेश बागवे यांचे चिरंजीव अविनाश बागवे हे निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं समजत आहे. शिवसेनेतर्फे अमोल देवळेकर या मतदारसंघातून निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. यंदाच्या लोकसभेला काँग्रेस उमेदवाराला इथून १३ हजार २५० मतं जास्त मिळाली होती. काँग्रेस उमेदवाराला मिळालेली ही वाढीव मतं भाजपसाठी धोक्याची ठरू शकतात. मविआघाडीतील मित्रपक्षांची योग्य ती मदत मिळाली तर याठिकाणी भाजप उमेदवाराचा पराभव करणं तुलनेनं सोपं आहे. अन्यथा भाजप उमेदवार इथून विजयाची हॅट्ट्रिक करू शकतो…
आता पाहूयात शेवटचा सहावा मतदारसंघ तो वडगाव शेरीचा…पोरशे कार प्रकरणात फ्रंट आलेले सुनील टिंगरे हे वडगाव शेरीचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार… राष्ट्रवादीच्या फुटीत ते अजित दादांसोबत गेल्याने सध्या त्यांच्या विरोधात अनेक इच्छुकांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी दाखवली आहे…त्यात भाजपकडूनच माजी आमदार जगदीश मुळीक, बापू पठारे, माजी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे हे उमेदवारीसाठी अडून बसलेत.. यांपैकी एखाद्या नाराज उमेदवाराला हाताशी धरून शरद पवार इथून राष्ट्रवादीची तुतारी जिंकण्यासाठी फिल्डिंग लावण्याची शक्यता आहे… पण सध्या तरी या मतदारसंघात दोन्ही बाजूला निवडणूक जिंकण्यासाठी फिफ्टी-फिफ्टी चान्सेस आहेत…तर अशी आहेत पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांचा येणाऱ्या निवडणुकीत पाहायला मिळणारा संभाव्य सहा आमदारांचा सविस्तर आढावा… बाकी या हा सहा मतदार संघात कोण आणि कुठल्या पक्षाकडून आमदारकीचा गुलाल उधळेल? आणि कुठल्या विद्यमान आमदारांना पराभवाचा धक्का बसेल? याबाबत तुमचे प्रेडिक्शन काय? ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा…