उन्हाळी सुट्टीचे तीनतेरा ! पुण्यातील सर्वाधिक गर्दीच्या ट्रेन 12 दिवसांसाठी बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गर्दीच्या हंगामात रेल्वे प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये भटकंतीसाठी रेल्वेचा पर्याय निवडणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. पुण्यातून सुटणाऱ्या आणि सर्वाधिक गर्दी असलेल्या तीन महत्त्वाच्या रेल्वे गाड्या 12 दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस, हावडा-पुणे दुरंतो एक्सप्रेस आणि पुणे-संत्रागाची एक्सप्रेस यांचा समावेश आहे.

‘आझाद हिंद एक्सप्रेस’ला सर्वाधिक फटका

रेल्वे प्रशासनानुसार, बिलासपूर विभागातील रायगड-झारसुगुंडा जंक्शनमध्ये कोटारलिया स्थानकावर चौथ्या मार्गाच्या कनेक्टिव्हिटीचे काम करण्यात येणार आहे. हे काम 11 एप्रिल ते 23 एप्रिल या कालावधीत चालणार असून, याचा मोठा परिणाम पुणे-हावडा मार्गावरील रेल्वे सेवांवर होणार आहे. यामुळे प्रवाशांनी तिकीट आरक्षण केले असले तरी त्यांचा प्रवास ठप्प होणार आहे. विशेषतः पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस या गर्दीच्या ट्रेनला याचा सर्वाधिक फटका बसणार आहे.

ऐन गर्दीच्या हंगामात रेल्वे काम का? प्रवाशांचे काय होणार?

उन्हाळी हंगाम हा प्रवाशांसाठी सर्वात महत्त्वाचा असतो. या काळात प्रवास करणाऱ्या कुटुंबांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. मात्र, रेल्वेने ऐन सुट्टीत हे काम हाती घेतल्याने हजारो प्रवाशांचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने याबाबत स्पष्टता देताना सांगितले की, महत्त्वाचे दुरुस्ती आणि विस्तार काम असल्याने ते पुढे ढकलणे शक्य नाही. त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी वाहतुकीचा विचार करावा आणि प्रवासाचे नियोजन व्यवस्थित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या गाड्या ठराविक तारखांना राहणार रद्द

  • संत्रागाची-पुणे एक्सप्रेस – 12 आणि 19 एप्रिल रद्द
  • पुणे-संत्रागाची एक्सप्रेस – 14 आणि 21 एप्रिल रद्द
  • पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस – 11 ते 24 एप्रिल रद्द
  • हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस – 11 ते 24 एप्रिल रद्द
  • हावडा-पुणे दुरंतो एक्सप्रेस – 10, 12, 17 व 19 एप्रिल रद्द
  • पुणे-हावडा दुरंतो एक्सप्रेस – 12, 14, 19 व 21 एप्रिल रद्द

प्रवाशांनी आता काय करावे?

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, या कालावधीत प्रवासाचे नियोजन पुन्हा तपासावे आणि शक्यतो पर्यायी मार्ग किंवा वाहतूक पर्यायांचा विचार करावा. तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना संपूर्ण परतावा मिळेल.