हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विरोधक एकवटले… थोरातांच्या नेतृत्वाखाली राजकारण शिजलं… आणि सुजय विखे पाटलांना लोकसभा निवडणुकीत पराभवाचा दणका बसला… हा निकाल सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा आणि प्रस्थापितांच्या विरोधात जाणारा होता… त्यामुळे आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे की विखे पाटलांच्या पुत्राचा लोकसभेला पराभव झाल्यानंतर विधानसभेला राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात नेमकं काय घडणार याकडे… सलग सात टर्म शिर्डीवर निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील हे मुलाच्या पराभवानंतर आपला शिर्डीचा बालेकिल्ला तरी वाचवू शकतील का? विरोधकांनी लोकसभेला जशी एकजूट दाखवली अगदी तशीच विधानसभेलाही दाखवत शिर्डीचा पारंपारिक मतदारसंघही विखे पाटलांच्या हातातून हिसकावून घेतला जाईल का? शिर्डी विधानसभेला विखे पाटलांना भिडण्याची धमक नेमकी कोणत्या भिडुत आहे? त्याचंच हे सविस्तर विश्लेषण…
विठ्ठल सहकारी साखर कारखाना… महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना काढून कारखानदारीची सुरुवात ज्यांनी केली ते विठ्ठलराव विखे पाटील… अहमदनगर जिल्ह्यातील आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील एक मोठं प्रस्थ… विठ्ठलराव यांच्यानंतर राधाकृष्ण आणि आता सुजय विखे पाटील ही पितापुत्रांची जोडगोळी सध्या जिल्ह्याच्या राजकारणावर दबदबा ठेवून आहेत… प्रवरानगर सहकारी साखर कारखाना आणि त्यानंतर सुरू झालेला संस्थात्मक राजकारणाचा प्रवास यामुळे शिर्डीत फक्त आणि फक्त विखे असं आगळे वेगळे समीकरण बनवून गेलं…राधाकृष्ण विखे पाटील हे सलग सात टर्म या मतदारसंघात आमदार असून त्यांना आव्हान देणं हे अद्याप कुठल्याच पक्षाच्या नेत्याला जमलेलं नाही हे वास्तव आहे… असं असलं तरी लोकसभा निवडणुकीत विखे पाटलांचा प्रभाव काहीसा ओसरल्याचं चित्र पहायला मिळालं… त्यांच्या हक्काचं मतदान असलेल्या शिर्डी लोकसभेत महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा दारुण पराभव झाला… शिवाय राधाकृष्ण विखे पाटलांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनासुद्धा निलेश लंके यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला…
थोडक्यात काय तर विखे पिता पुत्रांसाठी हा राजकीय पडझडीचा काळ आहे… लोकसभेतील विजयबाबत ओव्हर कॉन्फिडन्स असतानाही नगर मधून पहिल्याच पराभवाला विखेंना तोंड द्यावं लागलं… अर्थात हा झटका येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीही राधाकृष्ण विखे पाटलांचा मॉरल डाऊन करणार असेल, हे वेगळ्या भाषेत सांगायला नको… 2009 आणि 2014 ला शिवसेनेच्या राजेंद्र पिपाडा आणि अभय शेळके यांना पुरून उरत राधाकृष्ण विखे पाटील आमदार झाले… मात्र 2019 च्या निवडणुकीआधीच विखे पाटलांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपची वाट धरली. थेट विरोधी पक्षनेता सत्तेत जाऊन बसल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी झाल्या… खरंतर आघाडीच्या काळात अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार हा विखे पाटलांना देऊनही त्यांनी पक्ष बदलल्यानं त्यांचा समर्थक वर्ग गोंधळात होता… मात्र चिन्ह बदलूनही भाजपच्या तिकिटावर काँग्रेसच्या सुरेश थोरात यांचा तब्बल 69 हजारांच्या लीडने दारून पराभव केला… यानंतर शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर विखे पाटलांच्या खांद्यावर महसूल खात्याचा कारभार देण्यात आला, यावरून त्यांचा राज्याच्या राजकारणातील स्पेसही आपल्या लक्षात येऊ शकतो…
विखेंनी पक्ष बदलो… भूमिका बदलो.. तरीही एक हक्काची निर्णायक व्होट बँक ही कायम त्यांच्यासोबत असतेच… विखे पाटील हाच आमचा पक्ष अशी त्यांची राजकीय धारणा असल्याचं आढळून येतं… कारण संस्थात्मक राजकारणात जिल्ह्यात विखे पाटलांची बरोबरी कोणीच करू शकत नाही… विखे पाटील यांनी प्रवरा सहकारी साखर कारखाना, मुळा-प्रवरा वीज सहकारी संस्था, प्रवरा बॅंक, प्रवरा फळे व भाजीपाला उत्पादक संस्था, प्रवरा मेडिकल ट्रस्ट, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरा ग्रामीण नैसर्गिक-सामाजिक अध्ययन संस्था, साईबाबा संस्थान आदींच्या विविध पदांवर काम करताना उल्लेखनीय काम केलेलंय… रशिया, चिन, अमेरिका, इंग्लड, फ्रान्स, अशा अनेक देशांचे दाैरे करून शेतकऱ्यांसाठी, नवीन शिक्षणाबाबत अनेक तंत्रज्ञान आणले. राज्याचे कृषी व पणनमंत्री असताना त्यांनी केलेली कामे राज्याच्या स्मरणात आहेत… काॅंग्रेसमध्ये असताना विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेतेपद त्यांना मिळाले. या काळात त्यांनी भाजपवर अनेक प्रश्नांवर टीका केली. परंतु ती अत्यंत अभ्यासूपणे मांडली. केवळ आक्रमक न होता, त्यात अभ्यासूपणा दिसून येत होता… प्रशासन आणि राजकारणाचा दांडगा अनुभव असल्याने शिर्डीची जनता त्यांच्या बाजूने नेहमीच आनंदाने कौल देत आलीय…
पण 2024 उजाडताना बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत… नगरच्या राजकारणात नवनवीन सत्ताकेंद्र तयार होताना विखे पाटलांच्या प्रस्थापित राजकारणाला एका मागून एक धक्के लागत गेले… विखे पाटील हे सर्व समावेशक राजकीय चेहरा असले तरी त्यांच्या विरोधकांच्या सातत्याने वाढ होत गेली… याचेच परिणाम लोकसभा निवडणुकीला पराभूत होऊन विखे पाटलांना भोगावे लागले आहेत… आता लोकसभेनंतर विधानसभेलाही राधाकृष्ण विखे पाटलांना घरचा रस्ता दाखवण्यासाठी विरोधकांनी एकजूट दाखवण्याचा निर्णय घेतलाय… आणि त्यांचं नेतृत्व बाळासाहेब थोरात यांनी आपल्या खांद्यावर घेतल्याचं एकूणच शिर्डीचं सध्या चित्र आहे… शिर्डी विधानसभा मतदारसंघातूनच स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांकडून विखे पाटील यांच्या उमेदवारीला जोराचा विरोध केला जातोय… राजेंद्र पिपाडा हे निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत.. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची तशी मागणी देखील केली आहे… विखे पाटलांच्या विरोधात मतदारसंघात वातावरण आहे… त्यामुळे भाजपची हातची जागा वाया जाईल, असं म्हणून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीची मागणी केलीये… शिर्डी विधानसभा मतदारसंघाची रचना पाहिल्यास संगमनेर, राहता, कोपरगाव आणि श्रीरामपूर तालुक्यातील गाव एकत्रित येऊन हा मतदारसंघ तयार झालाय… या तालुक्यात राजकीय वर्चस्वांचे वेगवेगळे चेहरे आहेत…
यातले बहुतांश राजकारणी, गट हे विखे पाटलांच्या विरोधात गेल्याचं सध्याचे चित्र आहे… त्यात कोपरगावमधील स्नेहलता कोल्हे विरुद्ध विखे पाटील यांच्यातील वैर साऱ्या जिल्ह्यास ठाऊक आहे… त्यामुळे सर्वांनी एकत्रित विखे पाटलांच्या विरोधात प्रयत्न केले तर शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा निकाल काहीसा वेगळ्या वळणावर गेल्याच आपल्याला दिसू शकतं… लोकसभेला झालेली पिछाडी, विरोधकांची एकी आणि सत्ताधारी गटाच्या विरोधात तयार झालेले सहानुभूतीच वार हे सगळं जोडून पाहिलं तर प्रत्येक टर्मला शिर्डीमधून विखे पाटील ज्या भल्या मोठ्या लीडने निवडून यायचे… अशी परिस्थिती यंदा न राहता निकाल कट टू कट लागेल, एवढं मात्र निश्चित…
मराठा माळी धनगर ही जातीय समीकरणे शिर्डी विधानसभेत निर्णायक ठरतात… लोकसभेला या जातींचा सपोर्ट महाविकास आघाडीच्या बाजूने राहिल्याने… आणि जरांगे फॅक्टरनं मराठा समाजाचं सोशल इंजिनिअरिंग केल्यामुळे याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला झाल्याचं बघायला मिळालं… त्यामुळे अशीच स्थिती कायम राहिली तर विखे पाटलांना यंदा निवडून येण्यासाठी थोडी ओढाताण करावी लागणारय… पण विखे पाटलांच्या संस्थात्मक राजकारणापुढे आव्हान देणं आणि तेही शिर्डी विधानसभा मतदारसंघातून… हे वाटतं तितकं सोपं नाहीये… त्यामुळे लोकसभेप्रमाणे विखे पाटलांचा आता विधानसभेला करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी विरोधक काय खेळी करतात? कोणत्या चेहऱ्याला विखे पाटलांच्या विरोधात बळ देतात? बाळासाहेब थोरात यांचा प्रभाव शिर्डी विधानसभेवर पाहायला मिळेल का? की भाजपच्या अंतर्गत गटबाजीतूनच राधाकृष्ण विखे पाटलांना पराभवाचा धक्का बसेल? तुमचा अंदाज काय सांगतो? शिर्डीचा आमदार कोण? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…