मराठा व धनगर आरक्षणाचा प्रश्न भाजपच सोडवणार : राधाकृष्ण विखे- पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील दोन समाजातील जनता आरक्षण मागणीसाठी लढत आहे. ती म्हणजे मराठा व धनगर होय. या दोन्ही समाजाच्या आरक्षणावरुन विरोधक मात्र, सतत गरळ ओकण्याचे काम करीत असले तरी दोन्ही समाजाचा आरक्षणाचा प्रश्न फक्त भाजपच सोडवू शकतो. याची विरोधकांना खात्री पटल्यानेच त्यांच्याकडून आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्य शासनाला सतत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, काहीही झाले तरी या दोन्ही समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजप कटीबध्द आहे आणि भाजपच त्यांचे प्रश्न सोडवणार आहे तसेच महिनाभरातच म्हसवड शहरात नवीन तहसिल कार्यालय सुरु होईल मत राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले.

माण तालुक्यातील म्हसवड येथील पिण्याच्या पाण्यासाठी भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातुन मंजुर करण्यात आलेल्या योजनेचे व विविध विकासकामांचे भुमीपुजन राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर, माण – खटावचे आमदार जयकुमार गोरे, आ. राहुल कुल, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशिल‌ कदम, मनोज घोरपडे, सोनिया गोरे, तालुका अध्यक्ष शिवाजी शिंदे, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, नितीन दोशी, विजय धट, माजी नगरसेवक डॉ. वसंत मासाळ, इंजि. सुनील पोरे, धनाजी चव्हाण, रेश्मा कलढोणे, भाजप शहराध्यक्ष बी. एम. अबदागिरे आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी जाहीर सभेत मंत्री विखे – पाटील म्हणाले की, माण – खटावसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाने दडी मारल्याने पश्चिम महाराष्ट्रातील धरणे यंदा भरली नाहीत. पावसाने ओढ दिल्याने याठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, परतीच्या पावसाने सरकारला काहीसा दिलासा दिला आहे. नाहीतर पुन्हा दुष्काळाची टांगती तलवार सरकारसमोर होती. मात्र, ती वेळ आता येणार नाही. निसर्गसुध्दा आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन २०२४ पर्यंत देशातील सर्व घरात नळाचे पाणी गेले पाहिजे हे केंद्राचे नियोजन आहे त्यासाठी म्हसवड पालिकेलाही ८० कोटीचा निधी दिला आहे.

‘सबका साथ सबका विकास’ हा मुलमंत्र घेऊन देशभरात विकासकामे सुरु आहेत. मोदीजींचे नेतृत्व व कर्तृत्व संपूर्ण जगाने मान्य केले आहे. यापुर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी या भागाला वरदान ठरणाऱ्या पाणी योजना का पुर्ण केल्या नाहीत? याचा जाब सामान्य जनतेने आता विचारायला हवा. सामान्य जनतेचा विश्वासघात करणारे सत्तेत पुन्हा येवु देऊ नका. म्हसवड शहरात नवीन तहसिल कार्यालय सुरु करण्याची मागणी केली आहे ती मागणी मी आज पुर्ण करण्याचा शब्द देतोय महिन्याभरात शहरात नवीन तहसिल कार्यालय सुरु होईल त्यासाठी प्रांताधिकाऱ्यांना सुचना करण्यात आल्या असल्याचे विखे – पाटील यांनी सांगितले.