विशेष प्रतिनिधी | देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरुन राळ उठलेली असताना मोदी, शहा यांच्यावर टीका करणाऱ्यांचं प्रमाणही आता वाढलं आहे. आधी राजकारणातील विरोधी पक्ष नंतर सामान्य नागरिक आणि पुन्हा सेलिब्रिटी यांनीही या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरलेलं असताना आता भाजपमधील काही नेत्यांनी असा विरोध करणाऱ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली आहे.
देशात मोदी आणि उत्तरप्रदेशमध्ये योगी सरकार आहे. घोषणा देण्याआधी एकदा विचार करा. उगीच स्वतःच भविष्य बिघडवून घेऊ नका. उगीच काहीही बोललात तर जामीनही मिळणार नाहीच शिवाय तुम्हांला जमिनीत गाडून टाकू अशी धमकी भाजप नेते रघुराज सिंग यांनी दिली आहे. उत्तरप्रदेशमधील नुमाईश मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हेदेखील उपस्थित होते.
आपल्या वादग्रस्त भाषणात त्यांनी अनेक अकलेचे तारे तोडल्याचं पहायला मिळालं, यामध्ये पाकिस्तानने भारताकडे डोळे वर करून पाहिलं तर जगाच्या नकाशावर पाकिस्तान राहणार नाही, आम्ही काँग्रेसवाले नाही, उगीच विरोध केला तर लष्कराला सांगून आम्ही तुमचं जगणं मुश्किल करु असंही सिंग पुढे म्हणाले. रघुराज सिंग यांनी याआधीही अशी चिथावणीखोर भाषणं केली आहेत. भाजपमधील वाचाळवीर ठराविक अंतराने अशी विधानं करत असल्याने लोकांनी याकडे कितपत लक्ष द्यायचं हा मुद्दा आता उपस्थित राहत आहे.