राहुल गांधी पप्पू नव्हे तर स्मार्ट आहेत; RBI च्या माजी गव्हर्नर कडून कौतुक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांची (Rahul Gandhi) तोंडभरून स्तुती केली आहे. राहुल गांधी हे पप्पू नव्हेत तर एक स्मार्ट व्यक्ती आहेत असं म्हणत त्यांनी कौतुक केलं आहे. राहुल गांधी यांना अनेक मुद्द्यांवर भरपूर ज्ञान असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत रघुराम राजन म्हणाले की, राहुल गांधींसोबत मी गेल्या 10 वर्षांपासून चर्चा करत आहे. ते पप्पू अजिबात नाही. ते तरुण, हुशार आणि जिज्ञासू आहेत. जोखीम, जबाबदारी आणि त्याचं मूल्यांकन करण्याची एखाद्या व्यक्तीत चांगली समज असावी लागते आणि राहुल गांधी हे करण्यास पूर्णपणे सक्षम आहेत, असे रघुराम राजन यांनी म्हंटल.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या अनेक धोरणावर टीका करणारे रघुराम राजन यांनी राहुल गांधींची स्तुती केल्याने आणि भारत जोडो यात्रेत सहभाग घेतल्यांनंतर ते राजकारणात येणार का अशाही चर्चा सुरु आहेत. मात्र मी राजकारणात येणार नाही. भारत जोडो यात्रेच्या तत्त्वांवर माझा विश्वास असल्याने मी भारत जोडो यात्रेत सहभागी झालो होतो असं म्हणत रघुराम राजन यांनी सर्व चर्चाना पूर्णविराम दिला.