राहुल गांधींचा 1 कॉल… अन महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत जमलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखा (Lok Sabha Election 2024) कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. मात्र अजूनही कोणत्याही आघाडीने जागावाटप जाहीर केलेलं नाही. महाराष्ट्रात भाजप, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची महायुती आहे तर काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांची महाविकास आघाडी आहे. मात्र दोन्ही आघाडी आणि युतीने अद्यापही जागावाटपाची अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु आता महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या एका फोननंतर जागावाटपाबाबत अंतिम निर्णय झाल्याचे समजतंय .

सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोघांशीही काल फोनवरून महाराष्ट्रातील जागावाटप संदर्भात चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. (Rahul Gandhi Phone Call To Sharad Pawar And Uddhav Thackeray) त्याचा सकारात्मक परिणाम झाला असून येत्या 27 आणि 28 (फेब्रुवारी) तारखेला महाविकास आघाडी लोकसभा जागावाटपसंदर्भात बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याचा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या महाविकास आघाडीत ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे ३ प्रमुख पक्ष आहेत. त्यात आता वंचित आघाडीची भर पडली आहे. मतांचे विभाजन होऊ नये यासाठी त्या त्या मतदारसंघानुसार, राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष, अबू आझमी यांचा समाजवादी पक्ष, महादेव जानकर यांची रासप तसेच डाव्यांसोबत सुद्धा महाविकास आघाडीची चर्चा सुरु आहे. मात्र सध्या तरी लोकसभेच्या 48 पैकी 8 जागांवर चर्चा अडकली आहे. या जागांमध्ये मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई दक्षिण-मध्य, रामटेक, हिंगोली, जालना, शिर्डी, भिवंडी आणि वर्धा यांचा समावेश आहे. मात्र राहुल गांधी यांच्या फोननंतर या जगणावर सुद्धा तोडगा निघण्याची शक्यता आहे.