राहुल गांधींचे भारत जोडो; जम्मू काश्मीरच्या भूमीवर नवा अध्याय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आदिशंकराचार्यानंतर राहुल गांधी ही दुसरी व्यक्ती आहे, जी चालत कश्मीरला पोहोचली आहे. शंकराचार्यांच्या काळात तर रस्तेही नव्हते. आज रस्ता आहे, पण त्यावर बर्फाचे डोंगर झाले, ते पार करून राहुल गांधी कश्मीरात पोहोचतील व तिरंगा फडकवतील तेव्हा देशाच्या राजकारणातले नवे पर्व सुरू झाले असेल असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा तोंडभरून कौतुक केलं आहे. संजय राऊत स्वतः राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत सहभागी होते. त्यावेळचा यात्रेचा संपूर्ण अनुभव राऊतांनी सांगितला आहे.

राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेनिमित्त पठाणकोट ते जम्मू असा प्रवास गांधींबरोबर करता आला. 4 हजार किलोमीटर हा तरुण नेता चालत आहे. पठाणकोटचे दृश्य मी पाहिले. हजारो तरुण हातात पेटत्या मशाली घेऊन जम्मूत प्रवेश करीत होते व त्या पेटत्या मशालीनी त्या वेळी सारे आसमंत उजळून निघाले होते. जम्मू-कश्मीर हा यात्रेचा शेवटचा टप्पा आहे. जम्मूत पारा कमालीचा खाली घसरला. त्यात पाऊस. त्या परिस्थितीत राहुल व त्यांच्या पाठीमागे हजारो लोक चालत राहिले. मग जम्मूचा प्रवास संपवून प्रत्यक्ष खोऱ्याची, म्हणजे कश्मीरची सफर सुरू झाली, नगरोटापासून पुढे उधमपूर व नंतर पहाडी चढाई सुरू होईल. हा सर्व खडतर प्रवास राहुल गांधी करतील असं संजय राऊतांनी म्हंटल.

जम्मू-श्रीनगर 300 किलोमीटरच्या हायवेवर चालत जाणे सोपे नाही, आतापर्यंत या रस्त्याने कधीच कोणी चालत गेले नाही. मुगल रोड हा जुना मार्ग होता. त्यावरून पायी प्रवास करता येत होता. पठाणकोट ही जम्मूची बॉर्डर, यात्रेचे स्वागत लखनपुरला डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी केले. अब्दुल्ला म्हणाले, ‘आदिशंकराचार्यानंतर राहुल गांधी ही दुसरी व्यक्ती आहे, जी चालत कश्मीरला पोहोचली आहे. शंकराचार्यांच्या काळात तर रस्तेही नव्हते. आज रस्ता आहे, पण त्यावर बर्फाचे डोंगर झाले, ते पार करून श्री. गांधी कश्मीरात पोहोचतील व तिरंगा फडकवतील तेव्हा देशाच्या राजकारणातले नवे पर्व सुरू झाले असेल.

राहुल गांधी यांनी त्यांच्या यात्रेदरम्यान एक महत्त्वाचा मुद्दा मांडला व जम्मूच्या लोकांनी त्यास प्रतिसाद दिला. ते म्हणाले, ‘बाहेरचे लोक येऊन जम्मूवर नियंत्रण। ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.’ जम्मूचा सर्व व्यापार, उद्योग आज बाहेरच्या लोकांच्या हाती गेला. त्यामुळे छोटे दुकानदार, व्यापारी यांचे नुकसान होत आहे. बाहेरचे लोक येतात व जम्मूचे आर्थिक नियंत्रण हातात घेतात. या विरोधात लोकांच्या मनात संताप आहे. हे बाहेरचे लोक भाजपच्या राजकारणास आर्थिक पाठबळ देतात. स्थानिक लोकांचे त्यामुळे मरण झाले आहे. आता हे बाहेरचे लोक म्हणजे नक्की कोण? कश्मीर खोऱ्यातली लढाई पाकिस्तानी घुसखोरांविरुद्ध, तर जम्मूतील लोकांची लढाई देशातील व्यापारी मंडळाविरोधात, असे चित्र आहे.

ज्या कश्मिरी पंडितांच्या हत्येचा व घरवापसीचा ‘प्रपोगंडा’ ‘भाजपने राजकारणासाठी केला, ते कश्मिरी पंडित आज नेमक्या कोणत्या स्थितीत जगत आहेत? सत्य असे आहे की, पंडित आजही भीतीच्याच छायेखाली जगत आहेत. जम्मूत उतरताच मला सांगण्यात आले, कश्मिरी पंडित व त्यांची कुटुंबे मोठया संख्येने जम्मूत गेल्या सहा महिन्यांपासून रस्त्यावर बसली आहेत. आंदोलन करीत आहेत. हे सर्व सरकारी कर्मचारी आहेत व कश्मीर खोऱ्यात त्यांच्या नेमणुका आहेत. ‘टार्गेट कीलिंग’ पुन्हा सुरू झाल्याने हे सर्व कश्मिरी पंडित पुन्हा जम्मूत आले. ‘अतिरेकी ओळखपत्र पाहून गोळ्या घालतात. शाळा, सरकारी कार्यालयांत घुसून पंडितांच्या हत्या करतात. आम्हाला कसलेच संरक्षण नाही. तेव्हा आमच्या बदल्या जम्मूत करा,’ असे ते सांगतात व सरकार त्यांचे ऐकायला तयार नाही. कश्मिरी पंडितांनी खोऱ्यात जाऊन नोकरीवर रुजू व्हावे असे सरकारचे फर्मान आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार सरकारने बंद केल्याने आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली अशी माहिती संजय राऊतांनी सांगितली.

370 हटवल्यानंतरही कश्मिरी पंडितांची घरवापसी होऊ शकलेली नाही. आजही कश्मीर एक बंदिवान नंदनवन आहे. तरुणांना नोकऱ्या नाहीत व बेरोजगारीमुळे त्यांच्यात वैफल्य आहे. 370 कलम हटवल्यावर बाहेरचे उद्योग तेथे येतील हा ‘भ्रम खोटा ठरला. पण एका विशिष्ट प्रांताचे लोक जम्मूत आले व त्यांनी व्यापार हाती घेतला हे स्पष्ट आहे असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.