चिनाब ब्रिजवरून वंदेभारतचा रोमांचक प्रवास! आता वैष्णो देवी दर्शनासह काश्मीर ट्रिपची करा तयारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

माता वैष्णो देवीच्या दर्शनाचा बेत आखत असाल, तर यंदा काश्मीरची सफरदेखील यामध्ये जोडा. कारण आता कटरा ते श्रीनगर या दरम्यान थेट वंदेभारत ट्रेन चालवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ही ट्रेन जगातील सर्वात उंच ‘चिनाब ब्रिज’वरून धावणार आहे. या अनोख्या प्रवासाला सुरुवात १९ एप्रिलपासून होण्याची शक्यता आहे.

चिनाब ब्रिजवरून वंदेभारतचा रोमांचक प्रवास

रेल्वेमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कटरा ते श्रीनगर दरम्यानची रेल्वेसेवा लवकरच सुरू होणार आहे. यासाठी पहिल्याच दिवशी दोन वंदेभारत ट्रेन धावणार आहेत एक कटऱ्याहून श्रीनगरकडे तर दुसरी श्रीनगरहून कटऱ्याकडे. हा 272 किमी अंतराचा प्रवास फक्त ३ तास १५ मिनिटांमध्ये पूर्ण होईल.

पंतप्रधानांकडून हिरवा झेंडा

या दोन्ही वंदेभारत ट्रेनना पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार आहेत. ते कटऱ्यात प्रत्यक्ष उपस्थित राहून एक ट्रेन रवाना करतील, तर दुसऱ्या ट्रेनला वर्च्युअली झेंडा दाखवण्यात येणार आहे.

हिमालयात चालणारी विशेष ट्रेन

काश्मीरच्या हवामानाची दखल घेत, ही वंदेभारत ट्रेन विशेषरित्या बनवण्यात आली आहे. मायनस तापमानातही हीटरयुक्त केबिन, सिलिकॉन हीटिंग पॅड्स, बायो-टॉयलेटसाठी गरम पाण्याची सोय, तसेच ऑटो-ड्रेनिंग सिस्टीम अशा अत्याधुनिक सुविधांनी ही ट्रेन सज्ज आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांना उबदार वातावरण मिळणार आहे.

चिनाब ब्रिजवरून हवेतून जाण्याचा अनुभव

या प्रवासातील खऱ्या आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे चिनाब ब्रिज – जो जगातील सर्वात उंच आर्च ब्रिज आहे. या पुलावरून प्रवास करताना आपण हवेतून प्रवास करत असल्याचा थरार अनुभवता येणार आहे. हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहणारा असेल, असं रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे. तर, यंदा वैष्णो देवी दर्शनाचा प्रवास एका नव्या उंचीवर जाणार आहे तोही हवेतून! काश्मीरच्या सौंदर्याचा आणि वंदेभारतच्या विलक्षण प्रवासाचा आनंद लुटायला तयारी करा.