औरंगाबाद – दोन दिवसांपासून औरंगाबाद शहर आणि परिसरात पावसाने चांगलीच उघडीप दिली होती. मात्र आज 01 ऑक्टोबर रोजी दुपारपासून पुन्हा एकदा चार वाजता वीजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. औरंगाबद शहरासह दौलताबाद, खुलताबाद, पैठण, कन्नड भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे शहरातील जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झाले होते. दरम्यान पुढील तीन दिवस म्हणजे 04 ऑक्टोबरपर्यंत मराठवाड्यात पावसाचे वातावरण असेच राहिल, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
पुढचे चार दिवसात मराठवाड्यात कुठे अलर्ट ?
1 ऑक्टोबर- या दिवशी हिंगोली, जालना, औरंगाद, बीड आणि परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
2 ऑक्टोबर- या दिवशी परभणी, बीड, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात ढगांच्या कडकडाटासह काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
3 ऑक्टोबर- या दिवशी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर
4 ऑक्टोबर – औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, परभणी व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता, मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान सल्ला पत्रकात वर्तवण्यात आली आहे.
06 ऑक्टोबरला परतीचा पाऊस
दरम्यान, हवामान विभागाने परतीच्या पावसाचा अंदाजदेखील व्यक्त केला आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास 06 ऑक्टोबरला सुरु होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाचे दिल्ली येथील तज्ज्ञ के. एस. होसळीकर यांनी ट्वीट करून याविषयी माहिती दिली. मान्सूनचा परतीचा प्रवास वायव्य भारताच्या काही भागांतून सुरु होईल.