लोणंद -वीर-सासवड मार्गावरील नीरेचा पूल पाण्याखाली, वाहतूक बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लोणंद | सातारा जिल्ह्यात सर्वच धरणात क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणे भरण्यास सुरूवात झाली आहेत. तर वीर धरण 100 टक्के भरले असल्याने धरणातून नीरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नीरा नदीपात्रात पाण्यात वाढ झाली असून लोणंद -वीर-सासवड रोडवरील वीर धरणाच्या खालच्या बाजूचा जुना नीरा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे, त्यामुळे वाहतूक बंद आहे. पूल पाण्याखाली गेल्याने लोकांनी पाणी पाहण्यासाठी गर्दी केली आहे. वीर धरणाचे सात दरवाजातून 42 हजार 933 क्युसेस पाणी नीरा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती वीर धरण उपअभियंता विजय नलवडे यांनी दिली आहे.

सध्या वीर धरणाच्या उजवा कालवा विद्युतगृहातुन 900 क्युसेस व डावा कालवा विद्युतगृहातुन 300 क्युसेस विसर्ग नदीपत्रात सुरू आहे. वीर धरणाच्या सांडव्यातून आज सकाळी 6.30 वाजता 32 हजार 459 क्युसेस विसर्गामध्ये वाढ करून 41 हजार 733 क्युसेस इतका सुरु करण्यात आला आहे. नीरा नदीपत्रात एकूण 42 हजार 933 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी. नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये.
तरी सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सातारा, पुणे, सोलापुर, जिल्हयाची लाईफलाईन असणाऱ्या नीरा नदीवर वीरधरण बांधण्यात आले आहे. धरण प्रशासनाच्या वतीने नीरा नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जुन्या नीरा नदीवरील पूलाला संरक्षक कठडे नसल्याने कोणत्याही नागरिकाने पूलावरील पाण्यात जावू नये, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.