पुणे प्रतिनिधी । गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात सुरू असलेल्या पावसाने काल बुधवारी रात्री रूद्र रूप धारण करुन पुणेकरांची झोपच उडवली. काल रात्री पावसाचा जोर वाढत जात असल्यामुळे नागरिकांनी कालची रात्र भीतिदायक अवस्थेमध्ये जागून काढली.
कालच्या पावसाच्या सर्वाधिक फटका हा अरण्येश्वर परिसर , कात्रज परिसर आणि सहकार नगर येथील भागांना बसला. येथे रस्त्यांवर पाण्याचा प्रवाह हा वेगाने वाहत होता. आता मात्र या परिसरात पाणी ओसरल्यानंतर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी रात्री पार्क केलेल्या कार व दुचाकी रस्त्यांच्या मध्यभागी वा अन्यत्र वाहून गेल्या आहेत. आतापर्यंत पाच जणांचा बळी गेल्याची माहिती येत आहे. अग्निशामक दल व एनडीआरएफचे जवान यांच्या मार्फत बचाव कार्य सुरू आहे.
कालच्या अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यातील शाळा, महाविद्यालये यांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज सुट्टी जाहीर केलेली आहे. पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती या तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये आज बंद राहतील.