राज ठाकरेंचं सर्वपक्षीय नेत्यांना पत्र; पिंपरी चिंचवड-कसबा पोट निवडणुकीबाबत केलं ‘हे’ आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पिंपरी चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी सध्या महाविकास आघाडी व भाजपकडून तयारी केली जात आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात आले आहे. दोघांकडूनही ताकदीने लढणार असलेच सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतेच सर्वपक्षीय नेत्यांना पत्र लिहले आहे. “जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी,”असे आवाहन राज ठाकरेंनी पत्रातून केले आहे.

राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून पत्र सर्वपक्षीय नेत्यांना पाठवलेले आहे. त्यांनी पत्रात म्हंटले आहे की, महाराष्ट्र विधानसभेच्या २ आमदारांचं नुकतंच दुःखद निधन झालं. या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिडणुका होत आहेत. मी अगदी सुरुवातीपासून या मताचा आहे की, जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी. कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षालादेखील असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो.

अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एक प्रकारे, राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजलीच ठरणार नाही का? ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर, जनता देखील सहानभूती दाखवेलच असे नाही.

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या. त्यावेळेस मी देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केले होते. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली. आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत.

जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वांना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे.