मनसे महायुतीत सहभागी होणार? राज ठाकरे आणि अमित शहांच्या भेटीमुळे चर्चांना उधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली आहे. या दोघांमध्ये दिल्लीत अर्धा तास चर्चा झाली. त्यामुळेच मनसे देखील लवकरच महायुतीत(महायुती) सहभागी होईल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यानंतर महायुतीकडून लोकसभेसाठी मनसेला एक जागा देण्यात येऊ शकते. म्हणजेच शिवसेनेला जेवढ्या जागा देण्यात येतील त्यातील एक जागा मनसेच्या नावावर केली जाईल. यासाठी मनसे पक्ष महायुतीत सहभागी होत असल्याची अधिकृत घोषणा होणे आवश्यक आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाकडून लोकसभेच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. यानंतर भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार पंकजा मुंडे, पियुष गोयल यांना भाजपाकडून संधी देण्यात आली आहे. सध्या महायुतीमध्ये राज्यातील अनेक नेते सहभागी होत असल्यामुळे याचा फायदा निवडणुकीत भाजपला होईल असे सांगितले जात आहे. त्यामुळेच आता राज ठाकरेंचा मनसे पक्ष देखील महायुतीत प्रवेश करेल याची चर्चा सुरू झाली आहे. परंतु मनसे पक्ष भाजपात गेल्यानंतर त्यांना नेमकी कोणती जागा देण्यात येईल याबाबत मोठा सस्पेन्स ठेवण्यात आला आहे.

मुख्य म्हणजे दुसऱ्या बाजूला राज ठाकरे हे मराठी माणसाच्या हिताचा हिंदुत्वाचा आणि पक्षाचा विचार करूनच योग्य निर्णय घेतील, असे सरचिटणीस संदीप देशपांडेंनी म्हणले आहे. तसेच, बाळा नांदगावकर दिल्लीत खासदार म्हणून गेले तर आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया देखील मनसेच्या नेत्यांकडून देण्यात आली आहे. यातूनच मनसे भाजपशी हात मिळवणी करत महायुतीत सहभागी होईल हे निश्चित मानले जात आहे. यामुळेच आता सर्वांचे लक्ष मनसे पक्षात घडणाऱ्या हालचालींवर लागून राहिले आहे.