… म्हणूनच गांधीजींसारखा बहुदा दुसरं कोणी होणे नाही; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 2 ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंती… याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटर वर पोस्ट करत महात्मा गांधींबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गांधीजींचा प्रभाव असा काही पसरत गेला की, फक्त भारतच नव्हे तर जवळपास तीन खंडातील देशांमध्ये स्वातंत्र्याची आस जागृत झाली आणि ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला. पण जे गांधीजींना जमलं ते पुढे जवळजवळ कोणालाच जमलं नाही असं राज ठाकरेंनी म्हंटल.

महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असं नेतृत्व असेल की, जे देशांच्या सीमा तोडून पसरत गेले. तेही इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल नसताना. गांधीजींचा प्रभाव असा काही पसरत गेला की, फक्त भारतच नव्हे तर जवळपास तीन खंडातील देशांमध्ये स्वातंत्र्याची आस जागृत झाली आणि ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला. पण जे गांधीजींना जमलं ते पुढे जवळजवळ कोणालाच जमलं नाही. विशिष्ट राजकीय-सामाजिक परिस्थितीत प्रबळ वाटणारे नेते आले, कमालीचे लोकप्रिय झाले आणि पुढे काही वर्षातच मागे पडलेले दिसले आहेत.

दुसरं महायुद्ध जिंकल्यावर चर्चिल जगाला फॅसिझमच्या विळख्यातून सोडवणारा तारणहार म्हणून पुढे आले, पण त्यांची लोकप्रियता पुढे झपाट्याने ओसरली. ह्याला कारण चर्चिल ह्यांचं योगदान एका विशिष्ट परिस्थितीला पूरक होतं, ते चिरकाल टिकावं असं नव्हतं. पण गांधीजींचं तत्वज्ञान व्यापक होतं.

श्रृंखला मग त्या अज्ञानाच्या असोत, की गुलामगिरीच्या वसाहतवादाच्या की जातींच्या, त्या शृंखलांनी कुठल्याही माणसाला बांधून ठेवण्याचा अधिकार कोणालाच नाही, कारण सगळी माणसं ही मुळात समान आहेत, इतकं सोपं तत्व त्यांनी स्वीकारलं आणि त्यासाठी त्यांनी संघर्ष केला. हे खूप कठीण आणि दुर्मिळ आहे, म्हणूनच गांधीजींसारखा बहुदा दुसरं कोणी होणे नाही. आज महात्मा गांधी जयंती. गांधीजींच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.