मराठी माणसाला डिवचू नका; राज ठाकरेंचा राज्यपालांना इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता विविध राजकीय नेत्यांकडून याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. मनसेचे नेते राज ठाकरे यांनी ट्विट करत राज्यपालांना इशारा दिला आहे. “मराठी माणसाला डिवचू नका, हे वक्तव्य शोभणारे नाही,” असे ट्विट ठाकरेंनी केले आहे.

राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ” आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे म्हणून आपल्याविरूद्ध बोलायला लोक कचरतात. परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात. महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का? असा सवाल ठाकरेंनी विचारला आहे.

उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

राज्यपालांनी काय म्हणाले?

‘कधी कधी मी इथं लोकांना म्हणतो की, महाराष्ट्रात विशेष करुन मुंबई, ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढा, तर तुमच्याकडे पैसाच राहणार नाही. तुम्ही जे मुंबईला आर्थिक राजधानी म्हणताय ती राजधानी राहणारच नाही’, असे राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटले आहे.