हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।साधा सदरा गळ्यात मफलर… विरोधकांवर टीका न करण्याच्या स्वभावाने ते अस्सल मुरलेले राजकारणी वाटत नाहीत पण हा साधा भोळा मराठा चेहरा आपल्या फरडया इंग्रजीनं भल्याभल्यांना घाम फोडू शकतो. होय मी बोलतोय नाशिक लोकसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांच्याबद्दल… वाजे यांची उमेदवारी शिवसेनेकडून जाहीर करण्यात आल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. शिवसेना नाशिक जिल्हाप्रमुख विजय करंजकर आणि इतर बड्या नेत्यांना डावलून उद्धव ठाकरेंनी खासदारकीसाठी एका सर्वसामान्य मराठा नेतृत्वावर विश्वास टाकला. वाजेंच्या विरोधात आपण सहज निवडून येऊ असा काहीसा एटीट्यूड पहिल्या दिवसापासून महायुतीत पाहायला मिळाला. पण आता याच वाजेंनी जिल्ह्यात अशी काय फील्डिंग लावलीय की, हेमंत गोडसेंच्या नाकावर टिच्चून राजाभाऊ मशाल पेटवणारच! इतका कॉन्फिडन्स त्यांनी ठाकरेंना दिलाय. नाशिक सारख्या बालेकिल्ल्यातून अनेक पर्याय असतानाही राजाभाऊच योग्य पर्याय ठाकरे यांना का वाटले? आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला राजाभाऊ कसा परफेक्ट न्याय देतायत? राजाभाऊंना हलक्यात घेऊन शिंदेंनी कशी मोठी चूक केलीय? तेच सविस्तर पाहणार आहोत…
शिवसेनेत शिंदेंनी बंड केलं… नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसेही (Hemant Godse) यात सहभागी झाले… त्यामुळे ठाकरे येत्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या मोहऱ्याला नाशिकमधून उभं करणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली होती. नाशिक जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल असं वातावरण मतदारसंघात अनेक महिन्यांपासून होतं. करंजकरांनी तर निवडणुकीची तयारीही केली होती. “लोकसभा तुलाच लढवायची आहे असा आदेश मला उद्धव साहेबांनी दिलाय” असं म्हणून आपल्या नावाची फक्त औपचारिकताच बाकी असल्याचं वातावरण त्यांनी तयार केलं होतं. पण शिवसेनेच्या उमेदवारांची यादी आली आणि त्यात नाशिक मधून उमेदवारी देण्यात आली ती राजाभाऊ वाजे यांना…
करंजकर सक्षम उमेदवार नसल्याचं कारण पुढे करत वाजेंना उमेदवारी देण्यात आली होती. मग उमेदवारी मिळालेल्या राजाभाऊंकडे नेमकं असं काय होतं की ते उमेदवारीच्या स्पर्धेत सर्वात पुढे राहिले? तर याचे उत्तर देता येतं ते म्हणजे साधेपणा आणि निष्ठा. राजाभाऊ वाजे यांची कट्टर आणि कडवे शिवसैनिक अशी ओळख. घरातूनच राजकारणाचे बाळकडू पिलेल्या राजाभाऊंचे आजोबा शंकरराव वाजे हे सिन्नरचे पहिले आमदार तर त्यांच्या आजी रुक्मिणीबाई सिन्नर विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार म्हणून 1967 साली निवडून आल्या होत्या. राजाभाऊंचे वडील प्रकाश वाजे हे 2009 ला सिन्नर मधून आमदारकी लढले, मात्र यात त्यांचा पराभव झाला. आपल्या वडिलांच्या पराभवाचा बदल घेण्यासाठी म्हणूनच राजाभाऊ वाजे यांनी राजकारण करायचं ठरवलं. आणि 2014 ला ते सिन्नरचे आमदार झाले. तेव्हापासून राजाभाऊ वाजे हे कट्टर शिवसैनिक बनले. मातोश्रीचा शब्द हा अंतिम शब्द, ही त्यांच्या राजकारणाची खासियत. राजाभाऊ 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत होऊनही त्यांना डायरेक्ट लोकसभेचे तिकीट देण्यात आल्यानं अनेकांनी ठाकरेंच्या या निर्णयावर शंका घेतली होती. पण ठाकरेंना राजाभाऊ आणि त्यांच्या जिल्ह्यातील ताकदीची कल्पना चांगलीच ठाऊक होती…
त्यांची पहिली ताकद होती ती म्हणजे मराठा प्लस वंजारी असं मतदान खेचून आणण्याची ताकद… राजाभाऊ हे शांत, संयमी मराठा नेतृत्व. मराठा समाजासोबतच जिल्ह्यातील वंजारी समाजाशीही त्यांचे सौहार्दाचे संबंध आहेत. हे जातीचं गणित जोडून बघितलं, तर राजाभाऊ नाशकात उजवे ठरतात. शेती आणि पेट्रोल पंप व्यवसाय सांभाळणाऱ्या राजाभाऊंनी आपल्या आमदारकीच्या पहिल्याच टर्म मध्ये केलेल्या अनेक सामाजिक आणि विकासाभिमुख कामांनी मतदारांचे प्रेम मिळवलं होतं. जनसेवा मंडळासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तब्बल सव्वा कोटीहून अधिकची रक्कम वाजेंनी औषधोपचारासाठी गरजूंना मिळवून दिली होती. अपघातग्रस्तांना मदतीचा हात देण्यातही त्यांचा पुढाकार होता. साधा सदरा, गळ्यात मफलर असा लुक असल्याने विरोधकांनी त्यांना उमेदवारीनंतर हलक्यात घेतलं होतं. खासदाराला इंग्रजीतून बोलावं लागतं असं म्हणत त्यांच्या अबिलिटी वरच शंका घेण्यात आली होती. त्यावर राजाभाऊंनी खटक्यावर बोट जाग्यावर पलटी या न्यायाने विरोधकांना उत्तर देत चांगलीच अद्दल घडवली होती. माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने येऊन इंग्रजीतून चर्चा करावी. मी त्यांच्या सर्व प्रश्नांचे उत्तरे देईन. अगदी ग्रॅमॅटिकली व शुद्ध इंग्रजी भाषेत मी चर्चा करायला तयार आहे. त्यात थोडी जरी चूक झाली किंवा कोणी शोधली, तर मी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही…
राजाभाऊंनी दिलेल्या या आव्हानामुळे विरोधक गपगार पडले आणि राजाभाऊंना नाशिकमध्ये यामुळे मोक्कार पब्लिसिटी मिळून गेली. राजाभाउंचं नाव तर कन्फर्म झालं पण त्यांच्या विरोधात महायुतीकडून कोण निवडणूक लढणार? यावर काही निर्णय होत नव्हता. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना आपलं तिकीट कापले जाणार, याची कल्पना आल्यानं त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू केलं होतं. तर दुसऱ्या बाजूला दिल्लीतून छगन भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने त्यांचंच नाव फायनल केलं जाईल, असं बोललं जात होतं. गोडसे आणि भुजबळ यांच्यातील या वादामुळे महायुतीसाठी नाशिकचा तिढा चांगलाच वाढला होता. या मधल्या काळात राजाभाऊंनी आपल्या प्रचाराला चांगली धार लावली होती. राजाभाऊ हे नाव मतदारसंघात तोपर्यंत पोहोचलं देखील होतं. महायुतीचा उमेदवार ठरत नसल्यानं विरोधक राजाभाऊंना घाबरलंय… राजाभाऊ वर्सेस हू?… असा प्रचारही ठाकरेंकडून सुरू झाला. जो की त्यांना चांगलाच ऍडव्हान्टेज मिळवून देण्याची शक्यता आहे…
पण महायुतीकडून नाशिकच्या जागेला आणि विशेषतः राजाभाऊंच्या उमेदवारीला हलक्यात घेण्याचा कार्यक्रम सुरू होता. दिल्लीची इच्छा असतानाही आपलं नाव फायनल होत नाही, यामुळे थोड्याशा नाराजीनेच भुजबळांनी आपल्या उमेदवारीचा दावा सोडला. त्यानंतर लागलीच हेमंत गोडसेंना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली. पण उमेदवारी मिळवण्यासाठी गोडसेंनी केलेल्या वर्ष बंगल्या बाहेरील शक्ती प्रदर्शनापासून ते जिल्ह्यातील आंदोलनानं स्वतःची एक निगेटिव्ह इमेज बनवून घेतली. त्यात हेमंत गोडसेंवर जिल्ह्यातील भाजपचे आमदार नाराज होते. खासदार आमच्या कार्यक्षेत्रात लुडबुड करतात, कामं होऊन देत नाहीत असा त्यांचा आरोप होता. राष्ट्रवादीची भुजबळ कंपनीही गोडसेंच्या उमेदवारीवर फारशी खुश नाहीये. त्यामुळे उमेदवारी मिळाली… पण प्रचारासाठी आपलाच घोडा आणि आपलाच बैल अशी परिस्थिती सध्या हेमंत गोडसेंवर ओढवलीय… स्वतः मुख्यमंत्र्यांनी नाशकात जाऊन डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला पण त्यासोबतच गोडसेंना त्यांच्या चुका भर सभेत दाखवून दिल्यानं गोडसे नाशिकच्या लढतीसाठी चांगलेच मायनसमध्ये गेलेत..
म्हणूनच राजाभाऊ विरुद्ध हेमंत गोडसे अशी आपण लढत बघतो तेव्हा राजाभाऊ प्रचारात फार पुढे निघून गेल्याचे सध्या तरी नाशकात दिसून येतय… सिन्नर विधानसभा – इगतपुरी ग्रामीण वरची त्यांची पकड, मराठा चेहरा, स्वच्छ आणि संयमी नेतृत्व, ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट, गोडसेंच्या विरोधात असणारे नाराजी आणि या सगळ्याला मिळणारी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची जोड हे सगळं एकवार नीट जोडून पाहिलं तर यंदा नाशकात मशाल फिक्स असं बोलायला बराच स्कोप राहतो…त्यामुळे राजाभाऊ यंदा नाशकात खरंच मशाल पेटवणार का? जर असेल तर ते गोडसेंना कितीच्या लीडनं मात देतील? तुमची मतं, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा